टॅरिफ व ट्रेड संदर्भात अमेरिकन प्रतिनिधीचा मोठा दावा, हिंदुस्थान चर्चेसाठी तयार!

हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये व्यापारी संबंधावरुन तणावाचे वातावरण असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सल्लागार, व्यापार तज्ज्ञ पीटर नवारो यांनी मोठे विधान केले आहे. हिंदुस्थान वाटाघाटीच्या टेबलावर येत आहे, असे दावा नवारो यांनी केला आहे. रॉयटर्सने नवारो यांच्या एका मुलाखतीचा हवाला देत ही माहिती दिली आहे. येत्या मंगळवारी नवी दिल्लीमध्ये हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये व्यापारविषयक चर्चा होत आहे. त्याआधी नवारो यांनी हे विधान केले आहे. तणावाच्या काळातच डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘महान पंतप्रधान’ म्हटले होते आणि उभय देशांतील व्यापारविषयक संबंध पुन्हा रुळावर आणण्याचे संकेत दिले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानातील निर्यातीवर अतिरिक्त 25 टक्के कर लादल्यानंतर काही आठवड्यांनी हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी चर्चा होत आहे. अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के करामुळे ऑगस्टमधील दोन देशांतील चर्चेची सहावी फेरी स्थगित झाली होती. ती चर्चेची फेरी मंगळवारी होणार आहे.

वाणिज्य मंत्रालयातील विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी या व्यापार चर्चेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हिंदुस्थान आणि अमेरिका हे दोन्ही देश आता व्यापारविषयक चर्चेला गती देतील, असे अग्रवाल यांनी एका व्यावसायिक कार्यक्रमादरम्यान सांगितले. दक्षिण आशियासाठी अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच मंगळवारी चर्चेसाठी नवी दिल्लीचा एक दिवसाचा दौरा करणार आहेत, असेही अग्रवाल यांनी नमूद केले. मात्र चर्चेसंदर्भात अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

हिंदुस्थानला अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेमध्ये कधीतरी सहभागी व्हावे लागेल अन्यथा हे दिल्लीसाठी चांगले नसेल, असे पीटर नवारो आठवडाभरापूर्वी म्हणाले होते. ‘रिअल अमेरिकाज व्हॉइस’ शोला दिलेल्या मुलाखतीत नवारो बोलत होते. त्यामुळे हिंदुस्थानने नवारो यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.