खोमेनी सरकारला हादरवणारी सिक्रेट एजंट; नाजनीनला अटक, आंदोलनाला दिले हिंसक वळण

इराण सध्या कट्टरतावादी सत्ता आणि जनक्षोभ यांच्यातील संघर्षात होरपळत आहे. इराणमधील खोमेनी सरकारला हादरवून सोडणाऱ्या आणि देशभरात आंदोलनाची लाट निर्माण करणाऱ्या एका 63 वर्षीय महिलेला सुरक्षा दलांनी अटक केली आहे. नाजनीन बरादरन असे या महिलेचे नाव असून त्या आंदोलकांच्या मुख्य सूत्रधार असल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने दिलेल्या माहितीनुसार, नाजनीन बरादरन यांना एका अत्यंत गुंतागुंतीच्या इंटेलिजन्स ऑपरेशननंतर ताब्यात घेण्यात आले आहे. नाजनीन यांनी केवळ आंदोलनाचे नेतृत्वच केले नाही, तर आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागेही त्यांचाच हात असल्याचा आरोप इराण सरकारने केला आहे. विशेष म्हणजे, अटकेनंतर देशातील आंदोलनांचा जोर ओसरल्याचा दावाही तिथल्या सरकारी माध्यमांनी केला आहे.

नाजनीन बरादरन यांचा जन्म 1963 मध्ये झाला. त्यांनी शिराज विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इराणमधील सामाजिक प्रश्नांवर, विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी लढा देत आहेत.

कोडनेम आणि विदेशी कनेक्शन

तपासात असे समोर आले आहे की, नाजनीन बरादरन या ‘राहा परहम’ या कोडनेमचा वापर करून काम करत होत्या. त्यांचे संबंध इराणचे निर्वासित प्रिन्स रझा पहलवी यांच्याशी असल्याचे समजते. रजा पहलवी हे इराणच्या शेवटच्या शहांचे चिरंजीव असून ते सध्या परदेशातून खोमेनी सरकारविरोधात मोहीम राबवत आहेत. इतकेच नाही तर पहलवी यांच्या माध्यमातून नाजनीन या अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ आणि इस्रायलच्या संपर्कात होत्या, असा संशय इराणने व्यक्त केला आहे.