
रशियात खासगी विमान कंपनीचे हेलिकॉप्टर सोमवारी उड्डाणानंतर बेपत्ता झाले. बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध सुरू आहे. मगदानहून एक An-26 विमान देखील शोध मोहिमेत सहभागी झाले आहे. सुदूर पूर्वेकडील प्रदेशात हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले असून रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या विमान वाहतूक शाखेनेही शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर ओखोत्स्क शहरातून मागदानला चालले होते. ओखोत्स्क शहरातून मगदान शहराकडे उड्डाण करत असताना वॅझलेट एअरलाइन्सचे Mi-8 हेलिकॉप्टर नियोजित वेळेवर संपर्क साधण्यात अयशस्वी झाले. बेपत्ता झालेल्या Mi-8 हेलिकॉप्टरमध्ये तीन क्रू मेंबर्स आणि दोन तंत्रज्ञ होते. देखभालीचे काम पूर्ण करून सर्वजण त्यांच्या गंतव्यस्थानाकडे उड्डाण करत होते.