धोकादायक! पाकिस्तानात जाण्यापूर्वी विचार करा…; अमेरिकेची आपल्या नागरिकांना अ‍ॅडव्हायजरी, पाकची नाचक्की

पाकिस्तानात प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी अमेरिकेने नवीन अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. या अ‍ॅडव्हायजरीमध्ये पाकिस्तानात जाण्याबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिला आहे. परराष्ट्र विभागाने 26 जानेवारी रोजी पाकिस्तानसाठीच्या प्रवास मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले आहेत. नवीन अ‍ॅडव्हायजरीमध्ये गुन्हेगारी, नागरी अशांतता, दहशतवाद आणि अपहरणाची जोखिम या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात प्रवास करण्यापूर्वी नागरिकांनी दोनदा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्य प्रमुख असिम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची गेल्या वर्षाच्या अखेरिस भेट घेतली होती. अमेरिकेचे मित्र असल्याचे दाखवणाऱ्या पाकला यामुळे मोठा झटका बसला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे.

अ‍ॅडव्हायजरीमध्ये पाकिस्तानला लेव्हल 3 अंतर्गत धोकादायक श्रेणीत टाकण्यात आले आहे. पाकिस्तानात हत्या आणि अपहरणाचे प्रयत्न या घटना सामान्य आहेत. तसेच पाकिस्तानात वाहतूक केंद्रे, हॉटेल्स, बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, लष्करी आणि सुरक्षा सुविधा, विमानतळ, ट्रेन, शाळा, रुग्णालये, प्रार्थनास्थळे, पर्यटन स्थळे आणि सरकारी इमारती आदि ठिकाणांना लक्ष्य करत कोणत्याही क्षणी दहशतवादी हल्ले होतात, असे म्हटले आहे.

परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायजरीमध्ये अमेरिकन नागरिकांना कोणत्याही कारणास्तव लेव्हल 4 च्या भागात प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना देखील हा इशारा लागू आहे. विशेषतः खैबर पख्तूनख्वा येथील नागरिकांना हा इशारा लागू होतो.

लेव्हल 3 अ‍ॅडव्हायजरीत गंभीर सुरक्षा धोक्याचे संकेत दिले जातात. यामध्ये प्रवाशांना प्रवास योजनांचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला जातो. तर लेव्हल 4 हा उच्च सल्लागार स्तर आहे, यात सर्व प्रवास टाळण्याची शिफारस करण्यात येते.