
केंटमधील कॅन्टरबरी येथे मेंदुज्वराचा (Meningitis) प्रादुर्भाव झाला आहे. मेंदुज्वरामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य 11 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘युनिव्हर्सिटी ऑफ केंट’ने विद्यार्थ्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या अहवालानुसार, या संसर्गाचा संबंध शहरातील ‘क्लब केमिस्ट्री’ या नाईट क्लबशी जोडला जात आहे. ज्यांनी 5, 6 किंवा 7 मार्च रोजी या क्लबला भेट दिली असेल त्यांनी प्रतिबंधात्मक उपचारांसाठी तातडीने पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
मेंदुज्वराने बाधित रुग्णांमध्ये 18 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून UKHSA ने आतापर्यंत 30 हजाराहून अधिक विद्यार्थी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना अँटीबायोटिक्स दिली जात आहेत.
मेंदुज्वर म्हणजे काय?
मेंदुज्वर हा मेंदू आणि पाठीच्या कण्याला वेढणाऱ्या टिश्यूंना होणारा दाह आहे. हा संसर्ग प्रामुख्याने जीवाणू किंवा विषाणूंमुळे होतो. विद्यापीठ प्रशासन आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, सर्व विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.




























































