महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दीडपट पैसा बुडाला, अमेरिकन शेअर बाजार धडाम

अमेरिकेच्या शेअर बाजारात मंदीचे वारे असून महाराष्ट्राच्या पूर्ण अर्थव्यवस्थेच्या दीडपट पैसा एकाच दिवसात बुडाला आहे. सोमवारी टेक कंपन्यांचे शेअर्स गडगडल्यामुळे अमेरिकेच्या बाजारात एकच खळबळ माजली. विशेष म्हणजे अमेरिकन शेअर बाजारात फक्त सात कंपन्यांचे तब्बल 750 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जवळपास 500 अब्ज डॉलर्सएवढी आहे. म्हणजेच राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दीडपट पैसा एका दिवसात बुडाला.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून येत आहे. अशातच अमेरिकन शेअर बाजारात सोमवारी मोठी पडझड झाली. तंत्रज्ञान क्षेत्रातील सात मोठ्या कंपन्यांना 10 मार्च रोजी एका दिवसात भारी नुकसान सहन करावे लागले.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे टेरिफ धोरण आणि आंतरराष्ट्रीय भूमिका यामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. याचाच परिणाम जगभरातील शेअर बाजारात होत आहे. सोमवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दीडपट अर्थात 750 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. अ‍ॅपलचे 174 अब्ज डॉलर्स आणि एनविडियाचे 140 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. 5 टक्क्यांनी एनविडियाचे शेअर्स गडगडले अन् कंपनीला मोठा फटका बसला.

टेस्लाला 130 अब्ज डॉलर्सचा फटका

गुगल-अल्फाबेट, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला, एनविडिया आणि मेटा या अमेरिकेतील सात बलाढ्य कंपन्यांचे शेअर्स ढासळल्यामुळे बाजार कोसळला. त्यांचे सोमवारी एकाच दिवसात 750 अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाले. दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे बाजारमूल्य एका दिवसात 15 टक्क्यांनी घटले. 2020 पासूनची ही कंपनीची सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे. टेस्लाला 130 अब्ज डॉलर्सचा फटका बसला.