
मुंबईने आज दिल्लीचे तख्त फोडत प्ले ऑफचे स्थान आपल्याकडे खेचून आणले. 181 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचे तख्त 121 धावांतच फोडत मुंबईने प्ले ऑफचा संघर्ष जिंकला. आजच्या विजयामुळे मुंबईने प्ले ऑफमध्ये चौथे स्थान संपादले असून दिल्लीचा बाजार उठला. दिल्लीचा डाव 121 धावांतच आटोपल्यामुळे मुंबईने आपला आठवा सामना 59 धावांच्या फरकाने जिंकला.
दिल्लीने आधीच हार मानली
मुंबईच्या 181 धावांचा पाठलाग करताना दिल्ली जोरदार खेळ करील अशी अपेक्षा होती. पण मुंबईच्या गोलंदाजीपुढे दिल्लीच्या पुणाचेही चालले नाही. राहुल (11) आणि कर्णधार फॅफ डय़ुप्लेसिस (6) 3 षटकांत बाद झाले. पुढे समीर रिझवी (39) आणि विपराज निगमने (20) संघाची पडझड रोखली, पण ते धावांचा वेग वाढवू शकले नाही. त्यामुळे मिचेल सॅण्टनर आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेत दिल्लीचा डाव 19 व्या षटकांत 121 धावांवरच संपवला. मुंबईच्या डावाला वायुवेगाने 132 वरून 180 वर नेणारा सूर्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला.
रोहितचा फटका स्टॅण्डपासून दूरच
रोहित शर्मा स्टॅण्डमध्ये आज रोहित शर्माच्या षटकाराची वाट पाहिली जात होती. रोहित फलंदाजीला उतरल्यापासून याच स्टॅण्डमध्ये प्रेक्षकांचा कल्ला सुरू होता. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर रोहितच्या बॅटमधून चौकार बसताच या स्टॅण्डमध्ये ‘रोहित नामा’चा गजर सुरू झाला, पण हा गजर फारकाळ चालला नाही. तिसऱया षटकाच्या दुसऱयाच चेंडूवर रोहितची विकेट मुस्तफिझूर रहमानने काढली आणि रोहितचा डाव 5 धावांवरच संपवला. रोहितची बॅट शर्मा स्टॅण्डच्या दिशेने फिरण्याआधीच त्याने निराश केले.
मुंबईची कासवछाप फलंदाजी
रोहित बाद झाल्यावर रायन रिकल्टन आणि विल जॅक्स या फलंदाजांनी 25 धावांची भागी रचली. रायन 25 तर विल 21 धावांवर बाद झाले. 6 षटकांत 54 धावा करणाऱया मुंबईच्या फलंदाजांनी पॉवर प्लेनंतर फटके मारणेच बंद केले. खेळपट्टीवर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा उभे असूनही मुंबईचा धावफलक कासवगतीचे चालत होता. त्यामुळे पहिल्या दहा षटकांत मुंबईच्या 3 बाद 80 धावा झाल्या होत्या. मुस्तफिझूर, विपराज निगम आणि कुलदीप यादवने भन्नाट मारा करताना 12 षटके टाकत केवळ 77 धावा मोजल्या. मुंबईच्या डावात ना चौकार लागत होते ना षटकार. 10 षटकानंतर मुंबईची फलंदाजी व्हेंटिलेटरवर खेळत असल्याचा भास होत होता. सूर्या आणि वर्माने 8.3 षटके फलंदाजी करत संघाला 15 षटकांत 113 पर्यंत नेले. त्यांचा हा खेळ पाहून स्पर्धा मुंबईसाठी 150 सुद्धा अशक्य वाटत होते. 18 व्या षटकात 5 बाद 132 धावा करणाऱया मुंबईचा सूर्या-धीरने अक्षरशः कायापालट केला आणि 2 षटकांत 48 धावा फोडून काढल्या. सूर्याने आपली चौथी अर्धशतकी खेळी पूर्ण करताना 43 चेंडूंत 73 धावांची वादळी खेळी केली. त्याला नमन धीरनेही (24) अप्रतिम साथ दिली. सूर्याने आपल्या खेळीत 4 षटकार आणि 7 चौकार ठोकले. त्यामुळे 150 धावासुद्धा न गाठू शकणाऱया मुंबईने सूर्या-धीरमुळे 180 धावांची मजल गाठली.