
आयपीएलमध्ये घरचे मैदान म्हणजे सीएसकेचा अभेद्य किल्ला. मात्र यंदा याच किल्ल्यावर त्यांची खरी परीक्षा लागणार आहे. पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर जोरदार कामगिरी करणे सीएसकेसाठी अत्यावश्यक ठरणार आहे. पहिल्या पराभवापासून धडा घेत दुसऱया सामन्यात सीएसके विजयी प्रारंभासाठी सज्ज झाली आहे. आव्हान सोप्पे नसले तरी अशक्य मुळीच नाही.
धक्का आणि पुनरागमनाचे आव्हान
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सीएसकेची सुरुवात निराशाजनक झाली होती. गुवाहाटीत युवा खेळाडूंनी भरलेला संघ कोणत्याही विभागात प्रभाव टाकू शकला नाही. तिन्ही क्षेत्रांत ते तोंडघशी पडले होते. त्यामुळे आता तो पराभव विसरून नव्याने उभारी घेण्याची वेळ गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघावर आली आहे.
धोनीची उपस्थिती, फलंदाजीवर प्रश्नचिन्ह
महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे मैदानाबाहेर असला तरी डगआउटमधील त्याची उपस्थिती संघासाठी मोठा आधार ठरणार आहे. मात्र फलंदाजी अजूनही चिंतेचा विषय आहे. संजू सॅमसन, सरफराज खान यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे, तर डेवाल्ड ब्रेविसच्या फिटनेसवर अजूनही साशंकता आहे.
गोलंदाजीला धार हवी
मागील सामन्यात सीएसकेच्या गोलंदाजांची धार कमी पडली. हेन्री आणि नूर अहमद यांना प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमक फलंदाजीसमोर प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा असेल.
पंजाबचा उंचावलेला आत्मविश्वास
पंजाब किंग्स विजयाच्या ट्रकवर आहे आणि ते त्याच वेगात मैदानावर उतरणार आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. कूपर कॉनलीने फलंदाजीत स्थैर्य दिले, तर युजवेंद्र चहल आणि विजयकुमार वैशाक यांनी गोलंदाजीत प्रभाव टाकला आहे.
उभय संघ
चेन्नई – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एम. एस. धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जिमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंह, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नाथन एलिस, अकील होसेन, प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चाहर आणि जॅक फॉल्केस.
पंजाब – श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टोयनिस, अजमतुल्लाह उमरजई, मार्को जानसन, हरप्रीत बरार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुशीर खान, प्याला अविनाश, हरनूर पन्नू, सूर्यांश शेडगे, मिशेल ओवेन, जेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन, विशक विजयकुमार, यश ठाकूर, विष्णू विनोद, कूपर कोनोली, बेन ड्वार्शुइस, प्रवीण दुबे आणि विशाल निषाद.


























































