
इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सनी दमदार विजय मिळवत मोहिमेची विजयी सुरुवात केली. 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या 26 धावांत 4 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, समीर रिजवी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी संयमी खेळ करत डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 119 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. रिजवीने नाबाद 70 तर स्टब्सने नाबाद 39 धावा केल्या.
यापूर्वी, लखनऊ सुपर जायंट्सला आपल्या घरच्या मैदानाचा फायदा घेता आला नाही आणि संपूर्ण संघ 141 धावांत ऑलआऊट झाला. टी. नटराजन आणि लुंगी एनगिडी यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर लखनऊचे फलंदाज टिकू शकले नाहीत. अब्दुल समद (36) आणि मिचेल मार्श (35) यांच्याशिवाय अन्य फलंदाज अपयशी ठरले. दिल्लीकडून नटराजन आणि एनगिडी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत लखनऊचा डाव कोसळवला.





























































