IPL 2026 – हरभजन सिंगचे मुंबई इंडियन्सच्या ‘प्लेइंग इलेव्हन’वर मोठं वक्तव्य; ‘या’ दोन खेळाडूंमध्ये रंगणार चुरस!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 चा थरार 28 मार्चपासून सुरू होत आहे. हा थरार सुरू होण्यापूर्वी पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघ रचनेबाबत चर्चांना उधाण आले आहे. हिंदुस्थानचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने मुंबईच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर आपले मत मांडले असून, सलामीच्या जोडीबाबत संघ व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे. हरभजनच्या मते, दक्षिण आफ्रिकेचे दोन स्फोटक फलंदाज रायन रिकेल्टन आणि क्विंटन डी कॉक यांना एकाच वेळी संघात स्थान देणे मुंबईसाठी कठीण ठरेल.

हरभजन सिंगने ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना सांगितले की, मुंबई इंडियन्सकडे हिंदुस्थानी फलंदाजांची मजबूत फळी उपलब्ध आहे, त्यामुळे संघात परदेशी खेळाडूंचे संतुलन राखणे महत्त्वाचे असेल. रोहित शर्माची सलामीवीर म्हणून जागा निश्चित असून, त्याच्यासोबत रिकेल्टन किंवा डी कॉक यांपैकी एकालाच संधी मिळू शकते. मधल्या डावात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांसारखे भरवशाचे फलंदाज असल्याने दोन्ही आफ्रिकन खेळाडूंना टॉप ऑर्डरमध्ये एकत्र खेळवणे तांत्रिकदृष्ट्या सोपे नसेल, असा दावा हरभजनने केला आहे.

PAK Vs BAN – मैदानात सलमान आगाचा रडीचा डाव, ICC ने ताळ्यावर आणत केली कारवाई

फिरकी आक्रमणाबाबत बोलताना हरभजनने युवा फिरकीपटू अल्लाह गजनफरला पसंती दिली आहे. गजनफरकडे असलेल्या विविधतेमुळे तो फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो आणि कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतो, असे त्याने नमूद केले. मात्र, चेन्नईसारख्या टर्निंग ट्रॅकवर मिचेल सँटनरचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरेल, असेही त्याने स्पष्ट केले. एकंदरीत, मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसमात योग्य संघ निवडीसाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.