IPL 2026 – राजस्थानचा ‘रॉयल’ विजय! चुरशीच्या लढतीत गुजरातला हरविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ६ धावांनी बाजी मारली. जोफ्रा आर्चर व तुषार देशपांडे अखेरच्या दोन षटकांत अचूक गोलंदाजी करीत गुजरात घशापर्यंत गेलेला सामना खेचून आणला. ४ बळी टिपणारा रवि बिश्नोई या सामन्याचा मानकरी ठरला.

सुदर्शनची अर्धशतकी खेळी

राजस्थानकडून मिळालेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला ८ बाद २०४ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर साई सुदर्शनने ४४ चेंडूत ९ चौकार व ३ षटकारांसह ७३ धावांची खेळी करीत सामना गुजरातच्या बाजूने झुकवला होता. मात्र, कुमार कुशाग्र (१८) व जोस बटलर (२६) थोडा फार प्रतिकार करून बाद झाल्यानंतर मधली फळी अपयशी ठरल्याने राजस्थानला लढतीत पुनरागमन करता आले.

बिश्नोईने घेतली फिरकी

फिरकीपटू रवि बिश्नोईने आघाडीवीर सुदर्शनसह ग्लेन फिलिप्स (३), वॉशिंग्टन सुंदर (४), राहुल तेवतीया (१२) ही मधली फळी कापून काढत सामना राजस्थानच्या बाजूने झुकविला. मात्र, कर्णधार राशिद खान (२४) व कागिसो रबाडा (नाबाद २३) यांनी गुजरातच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. त्यांना अखेरच्या १२ चेंडूत विजयासाठी केवळ १५ धावांची गरज होती. मात्र, आधी जोफ्रा आर्चर मग तुषार देशपांडे अखेरच्या दोन षटकांत टिच्चून मारा केला. तुषारने राशिदला आर्चरकरवी झेलबाद करून गुजरातच्या अशांना सुरुंग लावला अन् राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानकडून रवि बिश्नोईने सर्वाधिक ४ फलंदाज बाद केले. नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे व रियान पराग यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

जैस्वाल, सूर्यवंशीची सलामी

त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ६ बाद २१० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यशस्वी जैस्वाल (५५) व वैभव सूर्यवंशी (३१) यांनी ३८ चेंडूंमध्ये ७२ धावांची खणखणीत सलामी देत आपल्या संघाला झकास सुरुवात करून दिली. प्रसिध कृष्णाने वैभवला फिलिप्सकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. वैभवने १८ चेंडूंत एका षटकासह ५ सणसणीत चौकार ठोकले. जैस्वालने आपल्या अर्धशतकी खेळीत ६ चौकारांसह ३ टोलेजंग षटकार लगावले. कॅगिसो रबाडाने जैस्वालचा त्रिफळा उडवून गुजरात टायटन्सला दुसरे यश मिळवून दिले.

ध्रुव जुरेलची फटकेबाजी

सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर ध्रुव जुरेलने (७५) फलंदाजीची सुत्रे हाती घेतली. कर्णधार रियान पराग (८) लवकर बाद झाल्यानंतर सिमरॉन हेटमायरकडून (१८) त्याला थोडी साथ मिळाली. जुरेलने ४२ चेंडूंत ७५ धावा फटकाविताना ५ षटकार व व तितक्याच चौकारांचा घणाघात केला. गुजरातकडून रबाडाने २, तर मोहम्मद सिराज, अशोक शर्मा, प्रसिध कृष्णा व राशीद खान यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.