आयपीएलचा लिलाव अबूधाबीमध्ये

इंडियन प्रीमियर लीग 2026 साठीचा खेळाडू लिलाव अबूधाबीमध्ये 16 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. आधी 14 डिसेंबर ही प्राथमिक तारीख ठरवण्यात आली होती, पण सूत्रांच्या माहितीनुसार आता 15 किंवा 16 डिसेंबर या दोन तारखांचा विचार सुरू आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2025 मध्ये आयपीएलचे  पहिले विजेतेपद पटकावले होते. गेल्या दोन लिलावांचे आयोजन परदेशात जेद्दाह आणि दुबई येथे झाले होते आणि यंदाही यूएईची राजधानी अबूधाबी सर्व 10 फ्रँचायझींचे स्वागत करणार आहे.

सुरुवातीला हिंदुस्थानात लिलाव घेण्याची शक्यता होती आणि मुंबई तसेच बंगळुरू ही शहरे चर्चेत होती, मात्र परदेशी सपोर्ट स्टाफ आणि प्रसारण जबाबदाऱयांच्या सोयीसाठी बीसीसीआयने परदेशातच लिलाव ठेवण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

दरम्यान, सर्व फ्रँचायझींना 15 नोव्हेंबरपर्यंत खेळाडू रिटेन्शन यादी अंतिम करायची आहे. याच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स  यांच्यात मोठा ट्रेड डील घडण्याची चर्चा आहे.

सूत्रांनुसार राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन चेन्नईमध्ये जाऊ शकतो, तर रवींद्र जाडेजा राजस्थानमध्ये दाखल होऊ शकतो. ही साधी खेळाडू अदलाबदल असेल की आणखी एखादा खेळाडू यात सहभागी असेल, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

याशिवाय गुजरात टायटन्सचा वॉशिंग्टन सुंदर सीएसकेमध्ये येणार अशी चर्चा होती, पण गुजरातने त्याला आयपील 2026 मध्ये नियमित खेळण्याची हमी दिल्यानंतर तो व्यवहार थांबला.