
आयपीएलच्या सामन्यांच्या आयोजनाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता अखेर दूर झाली असून कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्य क्रिकेट संघ आणि आरसीबी यांना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर यंदाच्या आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यास औपचारिक मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगळुरूकरांना पुन्हा एकदा आयपीएलचा जल्लोष अनुभवता येणार आहे.
गेल्या वर्षी आरसीबीच्या विजेतेपदानंतर झालेल्या समारंभात झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामने होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र राज्य सरकारच्या तज्ञ समितीने सुरक्षा आणि व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर अखेर हिरवा कंदील देण्यात आला. आता आयपीएलचा हंगाम 28 मार्चपासून सुरू होणार असून गतविजेता आरसीबी उद्घाटन सामन्यात सनरायझर्सशी याच मैदानावर भिडणार आहे.































































