
इराणने शुक्रवारी अमेरिकेचे F-15 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केल्यानंतर आता दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. या घटनेनंतर एक अमेरिकन पायलट इराणच्या हद्दीत बेपत्ता झाला असून, त्याला पकडण्यासाठी इराणने आता बक्षीस जाहीर केले आहे.
वैमानिकाची शोधमोहीम आणि बक्षीस
‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे सैन्य आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) या बेपत्ता पायलटला शोध घेत आहेत. हगिलुयेह आणि बोयर-अहमद प्रांताच्या राज्यपालांनी घोषणा केली आहे की, जो कोणी या शत्रू सैनिकाला (पायलटला) पकडून देईल, त्याला १० अब्ज तोमान (सुमारे ५५ लाख रुपये) बक्षीस म्हणून दिले जातील. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना पायलटला पकडण्याचे किंवा ठार मारण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
अमेरिकेचे रेस्क्यू ऑपरेशन
वृत्तानुसार, या F-15 विमानात दोन पायलट होते. त्यापैकी एकाला शुक्रवारी सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र दुसऱ्याचा शोध अजूनही सुरू आहे. बेपत्ता पायलटला शोधण्यासाठी अमेरिकेने हेलिकॉप्टर आणि इतर विमाने पाठवून बचाव मोहीम राबवली. दरम्यान, बेपत्ता वैमानिक जिवंत पकडला गेल्यास त्याला ओलीस ठेवले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर असे झाले, तर अमेरिका आणि इराणमधील हे युद्ध अधिक गंभीर वळण घेऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

























































