
इराणमध्ये गेल्या दोन आठवडय़ांपासून महागाईविरोधात संतप्त निदर्शने करण्यात येत आहेत. ‘जेन-झी’ रस्त्यावर उतरली असून इराणमधील 100 शहरांमध्ये आंदोलनाचे लोण पसरले आहे. हिंसाचारात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 8 मुलांसह एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, इराणमधील महत्त्वाचे धार्मिक केंद्र असलेले मशहद हे शहर आंदोलकांनी ताब्यात घेतल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
इराणमध्ये प्रचंड महागाई भडकली आहे. इराणचे चलन रियाल हे डिसेंबर 2025 मध्ये 1.45 कोटी प्रति अमेरिकन डॉलर एवढय़ा नीचांकी पातळीवर घसरले आहे. खाद्यपदार्थ तसेच औषधांच्या किमती 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. त्यातच सरकारने 62 टक्के करवाढ प्रस्तावित केल्यामुळे सर्वसामान्य जनता भडकली आहे. अखेर संतप्त झालेल्या ‘जेन-झी’ने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. 2,200 पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे.
इराणचे निर्वासित राजकुमार रझा पहलवी यांनी गुरुवारी लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर निदर्शने आणखी तीव्र झाली. राजधानी तेहरानमध्ये निदर्शकांनी रस्ते अडवले आणि जाळपोळ केली. लोकांनी ‘खामेनीचा मृत्यू’ आणि ‘इस्लामिक रिपब्लिक संपले’ अशा घोषणा दिल्या. काही ठिकाणी निदर्शकांनी क्राऊन प्रिन्स रझा पहलवी यांना पाठिंबा देत ‘ही शेवटची लढाई आहे, शाह पहलवी परत येतील’ अशा घोषणा दिल्या. तेहरान विमानतळदेखील बंद करण्यात आले आहे. इंटरनेट, पह्न सेवा तात्पुरत्या बंद केल्या.
मशहद शहरावर आंदोलकाचा ताबा?
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दावा केला की, मशहद या शहराचा आंदोलकांनी ताबा घेतला आहे. सुमारे 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी आंदोलन केले. सरकारच्या सुरक्षा दलांनी शहर सोडले आहे. ट्रम्प यांच्या दाव्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मशहद हे इराणचे सर्वात मोठे धार्मिक शहर असून इमाम रझा यांचा दर्गा तेथे आहे. शिया मुस्लिमांचे ते एक मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते.
खामेनी यांचे राष्ट्राला संबोधन
देशव्यापी निदर्शनांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी प्रथमच राष्ट्राला संबोधित केले. खामेनी म्हणाले की, दुसऱ्या देशाच्या राष्ट्रपतींना खूश करण्यासाठी निदर्शक स्वतःचा देश उद्ध्वस्त करत आहेत. ‘परदेशींसाठी काम करणारे भाडोत्री’ इराण खपवून घेणार नाही. निदर्शनांमागे परदेशी एजंट आहेत आणि ते देशात हिंसाचार भडकवत आहेत, असा दावा खामेनी यांनी केला.
ट्रम्प यांची धमकी
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सरकारला धमकी दिली आहे. आंदोलकांना मारल्यास अमेरिका इराणवर हल्ला करेल. ते दंगलीमध्ये नेहमी लोकांना मारतात. तसे झाल्यास आम्ही त्यांना अतिशय आक्रमकपणे लक्ष्य करू, असे ट्रम्प म्हणाले.





























































