
अमेरिका आणि इस्रायलवर इराणचे प्रतिहल्ले सुरूच असून रविवारी यूएईच्या फुजैरा बंदरावर इराणने जोरदार मिसाईल हल्ला चढवला. हिंदुस्थानी जहाज तेल भरत असतानाच हा हल्ला झाला. सुदैवाने या हल्ल्यातून हिंदुस्थानचे ‘जग लाडकी’ हे जहाज थोडक्यात बचावले असून तब्बल 80 हजार 800 टन कच्चे तेल घेऊन ते मायदेशाकडे रवाना झाले आहे.
अमेरिकेच्या प्रत्येक हल्ल्याला इराण तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहे. इराणच्या खर्ग बेटावर झालेल्या हल्ल्याचा ताबडतोब बदला घेत इराणने यूएईतील फुजैरा बंदरावर मिसाइल डागले. या बंदराजवळच अमेरिकेचा लष्करी तळ आहे. त्यालाही लक्ष्य करण्यात आले. सकाळच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्ल्याच्या वेळी तेल भरत असलेले ’जग लाडकी’ हे हिंदुस्थानी जहाज थोडक्यात बचावले असून त्यावरील सर्व कर्मचारी सुखरूप आहेत. सकाळी साडेदहा वाजता फुजेराह येथून हे जहाज निघाले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. इराण युद्ध सुरू झाल्यापासून हिंदुस्थानात सुरक्षित पोहोचलेले हे चौथे जहाज आहे. याआधी ’शेनलाँग’, शिवालिक आणि नंदा देवी ही जहाजे कच्चे तेल व गॅस घेऊन हिंदुस्थानात पोहोचली आहेत.
हल्ल्यानंतरही खर्ग बेटावरून व्यापार सुरू
अमेरिकेने इराणच्या खर्ग बेटावर हल्ला केल्यानंतरही या बेटावरून तेलाचा व्यापार सुरूच आहे. जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या प्लॅटफॉर्म टँकर ट्रकरच्या माहितीनुसार, खर्ग बेटावर अनेक टँकर तैनात आहेत. त्यानुसार काही टँकरमध्ये इंधन भरलेले असून इतर दोन टँकर भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
आम्ही चर्चेची विनंती केलेली नाही!
‘आम्ही कोणालाही युद्धबंदीची विनंती केलेली नाही किंवा चर्चेचाही प्रस्ताव ठेवलेला नाही. गरज पडेल तोवर आम्ही आमच्या देशाचे रक्षण करण्यास समर्थ आहोत. हे युद्ध बेकायदेशीर असून त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना उमगेल, तोपर्यंत आम्ही लढत राहू,’ असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज ठणकावले.
इराणने पहिल्यांदाच डागले ‘डान्सिंग’ मिसाइल
गेल्या 16 दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलला जोरदार टक्कर देणाऱ्या इराणने आज पहिल्यांदाच इस्रायलवर ‘सेज्जिल-2’ हे बॅलिस्टिक मिसाइल डागले. सुमारे 2,000 किलोमीटरपर्यंत हल्ल्याची या मिसाइलची क्षमता असून ते 700 किलोग्राम वजन वाहून नेऊ शकते. उंचीवर असताना दिशा बदलण्याच्या क्षमतेमुळे याला ‘डान्सिंग मिसाईल’ (नाचणारे क्षेपणास्त्र) असे म्हटले जाते. ’आयर्न डोम’ सारख्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना चकवण्याची क्षमताही या मिसाइलमध्ये आहे.
नेतन्याहू जिवंत असल्यास शोधून मारू… इराणची धमकी
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूची बातमी पंतप्रधानांच्या कार्यालयाने फेटाळल्यानंतर इराणच्या आयआरजीसीने धमकी दिली. ‘नेतन्याहू जिवंत असतील तर त्यांना शोधून मारू. निष्पाप मुलींची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही,’ असा इशारा इराणने दिला.



























































