इस्रायलकडून हल्ले सुरू असताना युद्धबंदीबाबत चर्चा करण्यास इराणचा ठाम नकार; तणाव आणखी वाढण्याची शक्यता

इस्रायल- इराण युद्धानंतर जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, रशियासह काही युरोपीय देशा दोन्ही देशातील युद्ध थांबून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, इराण आणि इस्रायल आपापल्या भूमिकेवर ठाम असून आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. इस्रायलकडून सातत्याने हल्ले सुरू असताना युद्धबंदीसाठी कोणत्याही वाटाघाटी किंवा चर्चा करण्यास इराणने ठाम नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इराणने मध्यस्थीचे प्रयत्न करणाऱ्या कतार आणि ओमानला स्पष्टपणे सांगितले आहे की, इस्रायलकडून सातत्याने हल्ले सुरू असताना युद्धबंदीच्या वाटाघाटी किंवा चर्चा करण्यास ते तयार नाहीत. इराणच्या या भूमिकेमुळे व्यापक संघर्षाची भीती निर्माण केली आहे. तसेच जगाची चिंता वाढली आहे. इराणने कतार आणि ओमान या देशांसह मध्यस्थी करणाऱ्या देशांना स्पष्ट केले आहे की, इस्रायलच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्यानंतरच वाटाघाटी किंवा चर्चा करण्याबाबत विचार करण्यात येईल. सद्यस्थितीत कोणत्याही वाटाघाटी किंवा चर्चा करण्यास इराणने ठाम नकार दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इस्रायलने शुक्रवारी सकाळी इराणवर अचानक हल्ला केला. त्यामुळे इराणच्या लष्करी कमांडचा उच्चपदस्थ अधिकारी ठार झाला आणि इराणमधील अण्वस्त्र ठिकाणांना इस्रायलने लक्ष्य केल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलला चोख प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे.

अलिकडच्या काही महिन्यांत ओमानने अमेरिका आणि इराणमधील अणु चर्चेत मध्यस्थी केली आहे, जरी इस्रायलने इराणविरुद्ध जोरदार हवाई हल्ले सुरू केल्यानंतर एका दिवसातच ही चर्चा रद्द करण्यात आली. याआधी कतारने दोन्ही देशातील चर्चेत मदत करण्याची भूमिका बजावली आहे. ओमान आणि कतारचे इराण आणि अमेरिका या दोघांशी चांगले संबंध आहेत आणि त्यांनी थेट इस्रायलशीही संवाद साधला आहे. मात्र, इराण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.