
युद्धाच्या बाराव्या दिवशी इराणने आज अमेरिका व इस्रायलला प्रचंड मोठा दणका दिला. इराणने हिजबुल्लाहच्या मदतीने इस्रायलची राजधानी तेल अवीव व आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर तुफानी हल्ले चढवले. क्लस्टर बॉम्बचा वर्षाव केला. इतकेच नव्हे, आता गुगल, अॅमेझॉनसह अमेरिकेशी संबंधित बँका व आर्थिक संस्थांना लक्ष्य करण्याचा इशारा इराणने दिला आहे.
इराणच्या सर्वात मोठय़ा सरकारी बँकेवर सोमवारी अमेरिकेने हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता इराणने आखाती देशातील अमेरिकेशी संबंधित बँका व वित्तसंस्थांवर हल्ले करण्याची रणनीती आखली आहे.
आखाती देशातून अमेरिकेला मिळणारी रसद तोडण्याचा यामागचा हेतू आहे. याशिवाय, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)ने अमेरिकेच्या टेक कंपन्यांची कार्यालये व प्रकल्पांची यादीच बनवली आहे. ही ठिकाणे आता इराणी लष्कराची पुढची टार्गेट असतील, असे वृत्त इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. आयआरजीसीच्या निशाण्यावर असलेल्या कंपन्यांमध्ये गुगल, अॅमेझॉनसह मायक्रोसॉफ्ट, पॅलन्टीर टेक्नॉलॉजीस, आयबीएम, एनवीडिया आणि ओरॅकल कॉर्पोरेशनचा समावेश आहे. या कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर अमेरिकी लष्कर करत असल्यामुळेच त्या इराणच्या रडारवर आल्या आहेत.
…तर आखातातील सर्व बंदरे उडवून देऊ
इराणच्या बंदरांवर हल्ला झाल्यास आम्ही इस्रायलसह आखाती देशातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांची सर्व बंदरे उडवून देऊ, अशी धमकी इराणने दिली आहे. दरम्यान, इराणने ओमानमधील सलल्लाह बंदरावर ड्रोन हल्ला चढवला.
महागाई आग लावणार, कच्चे तेल 200 डॉलरवर जाणार
इराण युद्ध जगाला भलतेच महागात पडणार आहे. जगभरात महागाईची आग लागण्याची शक्यता आहे. इराणने तसे संकेतच दिले आहेत. ’तेलाच्या किंमती या प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्यावर अवलंबून असतात. तुम्ही ते सगळे अस्थिर करून टाकले आहे. त्यामुळे कच्चे तेल बॅरलमागे 200 डॉलरवर जाईल. त्यासाठी तयार राहा, असा इशारा इराणने अमेरिका, इस्रायल व त्यांना पाठिंबा देणाऱया देशांना दिला आहे.
इराण-अमेरिका युद्धात तीन हिंदुस्थानींचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी आज दिली. व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात दोन हिंदुस्थानी नाविकांचा मृत्यू झाला, तर एक बेपत्ता आहे. तर, काही जण जखमी झाले आहेत. हिंदुस्थानी दूतावास त्यांच्या संपर्कात असून त्यांना मदत दिली जात आहे, असे जयस्वाल यांनी सांगितले.
गुजरातकडे येणाऱया थाई जहाजावर हल्ला दोन हिंदुस्थानींचा मृत्यू
होर्मुझच्या सामुद्रधुनीत बुधवारी तीन व्यापारी जहाजांवर इराणने मिसाईल हल्ले केले. यात जपानी, ब्रिटिश आणि थाई जहाजांचा समावेश आहे. हल्ला झालेल्या जहाजांपैकी ‘मयूरी नारी’ हे थाई जहाज गुजरातच्या कांडला बंदराकडे येत होते. या हल्ल्यात जहाजावरील दोन हिंदुस्थानी कर्मचाऱयांचा मृत्यू झाला असून अन्य एकजण बेपत्ता आहे. हिंदुस्थानने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
इराणमध्ये हल्ला करायला काहीच उरले नाही!
इराणविरुद्धचे युद्ध लवकरच संपेल, असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा केले. ‘युद्ध थांबवायला हवे असे मला जेव्हा वाटेल तेव्हा ते थांबेल. अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने आमचे लष्कर हल्ले करत आहे. इराणमध्ये आता सगळे काही संपले आहे. हल्ला करण्यासारखे आता तिथे काहीही उरलेले नाही,’ अशी मल्लिनाथी त्यांनी केली.
वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प आणि एपस्टीनची टायटॅनिक पोझ
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सेक्स स्पॅण्डलमधील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांचा ‘टायटॅनिक पोझ’मधील पुतळा सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये ट्रम्प यांचे नाव आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘द सिव्रेट हॅण्डशेक’ नावाच्या संघटनेने हा पुतळा उभारला आहे. अमेरिकेसारख्या खऱयाखुऱया लोकशाही देशातच हे घडू शकते, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटली आहे.























































