
आखातातील इराणवर हल्ला चढवल्यानंतर आता अमेरिकेला सोडणार नाही अशा भूमिकेत इराण शिरला आहे. इराणला काही वेळात नमवू अशा विचारात असलेली अमेरिकेला ११ दिवसांनंतर देखील ताब्यात आणता आलेले नाही. अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यांना उत्तर देताना इराणने वेगळे डावपेच खेळत आखातील आपल्या शेजारील देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांना आणि महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक रोखून धरली आणि अमेरिकेसोबत जगभरातील देशांना याची झळ बसू लागली आहे. अमेरिकेनेही माघार घेण्याची मानसिकता नसल्याचे दाखवल्यानंतर अमेरिकेच्या बँका, कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या टेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
आखाती देशातील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र आणि भयानक होत चालले आहे. आता इराणने आपला मोर्चा जगातील बलाढ्य अमेरिकन टेक कंपन्या आणि बँकांकडे वळवला आहे. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’शी (IRGC) संबंधित असलेल्या ‘तसनीम’ न्यूज एजन्सीने इस्रायल आणि आखाती देशांमधील अशा कार्यालयांची यादी जाहीर केली आहे, जी आता इराणच्या ‘नव्या टार्गेटस’ यादीत समाविष्ट आहेत.
या टेक कंपन्यांना दिला इशारा
इराणने प्रसिद्ध केलेल्या यादीत गुगल (Google), मायक्रोसॉफ्ट (Microsoft), पालांटिर (Palantir), आयबीएम (IBM), एनव्हीडिया (Nvidia) आणि ओरॅकल (Oracle) यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे तंत्रज्ञान लष्करी कारवायांसाठी वापरले जात असल्याचा दावा इराणने केला आहे. इराणने म्हटले आहे की, ‘विस्तारत चाललेल्या या युद्धात आता पायाभूत सुविधांचाही समावेश झाला असून, इराणच्या कायदेशीर लक्ष्यांची व्याप्ती वाढली आहे.’ या कंपन्यांची कार्यालये इस्रायलसह दुबई आणि अबू धाबीसारख्या आखाती शहरांमध्ये आहेत.
बँकांपासून दूर राहण्याचे आवाहन
केवळ टेक कंपन्याच नव्हे, तर इराणने अमेरिकन आणि इस्रायली बँकांनाही लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. आयआरजीसीच्या ‘खातम अल-अंबिया’ मुख्यालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, ‘शत्रूने इराणमधील एका बँकेवर हल्ला करून आमचे हात मोकळे केले आहेत. आता आम्ही या क्षेत्रातील अमेरिकन आणि झिओनिस्ट राजवटीच्या बँकांवर हल्ले करू.’ इराणने आखाती देशांतील नागरिकांना इशारा दिला आहे की, त्यांनी या बँकांच्या एक किलोमीटरच्या परिघात राहू नये.
बँकेवरील हल्ल्याचा बदला
इराणी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात तेहरानमधील एका सरकारी बँकेला (बँक सेपा) लक्ष्य करण्यात आले होते, ज्यात अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. याचाच बदला म्हणून इराण आता आखाती देशांमधील आर्थिक केंद्रांना लक्ष्य करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी दुबई विमानतळाजवळ दोन ड्रोन पाडण्यात आले, ज्यात एका हिंदुस्थानसह चार जण जखमी झाले आहेत.
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे आणि आता थेट आर्थिक व तांत्रिक केंद्रांना लक्ष्य केल्यामुळे जागतिक बाजारपेठेत आणि आशियाई देशांमध्ये, विशेषतः हिंदुस्थान आणि चीनमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आता इराण टेक कंपन्या आणि बँकांवर हल्ले चढवले तर मात्र जग मोठ्या संकटात सापडणार आहे. अनेक देशांमधील उद्योग आर्थिक दिवाळखोरीत जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

























































