
गेल्या पाच आठवड्यांपासून इराण, अमेरिका-इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेले हे युद्ध धोकादायक वळणावर पोहोचले असून इराण अमेरिका-इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमानं पाडली आहेत. या विमानांमधील एका पायलटला सुरक्षित बाहेर काढण्यात अमेरिकेला यश आले असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अमेरिकेने बेपत्ता पायलटचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले असून ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर रणांगणात उतरवले आहेत. मात्र या हेलिकॉप्टरलाही इराणने लक्ष्य केले आहे.
शुक्रवारी अमेरिकन वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टरवर इराणने बेछुट गोळीबार केला. हे हेलिकॉप्टर एफ-15 ई लढाऊ विमानातील बेपत्ता पायलटचा शोध घेण्यासाठी इराणच्या भूमीवर दाखल झाले होते. अमेरिकेचे हेलिकॉप्टर जमिनीपासून थोड्याच उंचीवर उडत होती. याचवेळी इराणच्या सैनिकांनी त्यावर अंदाधुंद गोळीबार केला. ही हेलिकॉप्टर्स कशीबशी इराणच्या हद्दीबाहेर पडण्यात यशस्वी झाली असली तरी या मोहिमेत काही जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर इराणचे सैन्य अमेरिकेच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार करत असल्याचे एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. इराणचे सैन्य जमिनीवरून लढण्यासाठी तयार असल्याचे यात दिसत असून यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.
WATCH: Iranian police firing at two U.S. HH-60W Jolly Green II helicopters during a search for the downed F-15E crew jet today. pic.twitter.com/mMdrRAlUIN
— Clash Report (@clashreport) April 3, 2026
24 तासात अमेरिकेचे मोठे नुकसान
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी आखातामध्ये युद्धाचा भडका उडाला. तेव्हापासून गेल्या 24 तासातील काळ अमेरिकेसाठी सर्वात कठीण गेला आहे. शुक्रवारी अमेरिकेची एफ-15 ई आणि ए-10 थंडरबोल्ट ही दोन लढाऊ विमानं इराणने पाडली. तर एक एफ-16 विमान आपत्कालीन स्थितीत उतरवावे लागले, तर दोन KC-135 रिफ्यूलिंग टँकर्सनीही तांत्रिक आणीबाणी जाहीर केली. त्यानंतर बेपत्ता पायलटचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आलेली अमेरिकेची दोन HH-60W जॉली ग्रीन II अर्थात ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सदेखील इराणच्या गोळीबारात अडकली. यामुळे अमेरिकेच्या युद्ध मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
पायलटच्या शोधासाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा
दुसरीकडून इराणच्या ‘रिव्होल्यूशनरी गार्ड्स’ने बेपत्ता अमेरिकन पायलटचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबवली आहे. हे युद्ध आता केवळ सत्तापालटासाठी उरले नसून, अमेरिकन वैमानिकांच्या शिकारीचे युद्ध बनले आहे, असे इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाकर कालीबाफ यांनी म्हटले. तसेच स्थानिक नागरिकांनाही या पायलटला पकडून देण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यासाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.

























































