
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत आहे. यामुळे बाजारात महागाईचा परिणाम दिसून येत आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर साबण, सोडा आणि खाद्यतेल यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू देखील काही दिवसांतच महाग होण्याची शक्यता आहे. जलद गतीने विकल्या जाणाऱ्या ग्राहक वस्तू (FMCG) कंपन्या 2027 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून पुन्हा भाववाढ करण्यच्या तयारीत आहेत.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्याने आणि रुपया घसरल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. यामुळे कंपन्यांना किमती स्थिर ठेवणे अधिकाधिक कठीण झाले आहे. तसेच ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, सध्याची कच्च्या मालाची महागाई कायम राहिल्यास 2027 या आर्थिक वर्षात वस्तूंची किमती किमान ३ ते ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे.
जवळपास प्रत्येक एफएमसीजी कंपनी आपली उत्पादने (साबण, बिस्किटे, शाम्पू) तेलापासून बनवलेल्या प्लास्टिकमध्ये पॅक करते. आता, पॅकेजिंगचा खर्च वाढल्यामुळे कंपन्या उत्पादने जास्त किमतीत विकतील. शिवाय, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागत आहे. यामध्ये कंटेनर भाड्यापासून ते जहाजाच्या विम्यापर्यंत सर्व काही महाग झाले आहे. हिंदुस्थान केवळ कच्चे तेलच नाही, तर खाद्यतेलाचा मोठा हिस्साही इतर देशांकडून समुद्रमार्गे आयात करतो. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास, तर खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

























































