
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेला कोणत्याही देशाच्या मदतीची आवश्यकता नसल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी स्पष्ट केले. अमेरिकन मित्रराष्ट्रांनी या मोहिमेत सामील होण्यास नकार दिल्यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले.
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरल्यामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच मित्रराष्ट्रांना आपली युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले होते. मात्र, जर्मनी, स्पेन आणि इटली यांसारख्या प्रमुख देशांनी अमेरिकेची ही मागणी फेटाळून लावली आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज़ यांनी यावर भाष्य केले. या युद्धाचा निर्णय घेताना वॉशिंग्टन किंवा इस्रायलने बर्लिनशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला नव्हता, तसेच जर्मनीकडे अशा मोहिमेसाठी आवश्यक असलेला संयुक्त राष्ट्र किंवा नाटोचा कोणताही कायदेशीर जनादेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
America Israel- Iran War- नो, न्हाय, नेव्हर! अमेरिकेचं आवाहन जपान, ऑस्ट्रेलियाने धुडकावून लावलं
मित्रराष्ट्रांच्या या भूमिकेवर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे आणि आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. ही विनंती केवळ संकटकाळात मित्रराष्ट्र अमेरिकेच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे राहतात, हे पाहण्यासाठी केली होती. वर्षानुवर्षे अमेरिका या राष्ट्रांच्या संरक्षणासाठी अफाट पैसा खर्च करत आहे, मात्र गरज पडल्यावर हे देश सोडून जातात, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी ट्रम्प यांनी विशेषतः ब्रिटनच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. युद्धाच्या सुरुवातीला ब्रिटनकडे दोन विमानवाहू युद्धनौका मागितल्या होत्या, परंतु त्यांनी तेव्हा नकार दिला. आता युद्ध अंतिम टप्प्यात असताना ब्रिटनने मदतीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र अमेरिकेने धुडकावून लावला आहे.


























































