Iran War- इराणने मालवाहू जहाजांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात हिंदुस्थानी इंजिनिअरचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेत वाढलेल्या अमेरिका आणि इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पर्शियन आखातात एका तेल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात, हिंदुस्थानी मरीन इंजिनिअर यांचा मृत्यू झाला. देवनंदन प्रसाद सिंह असे या इंजिनिअरचे नाव असून, मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील ते रहिवासी होते. अमेरिकेच्या मालकीच्या कच्च्या तेलाच्या टँकरवर अतिरिक्त मुख्य इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. देवनंदन प्रसाद सिंग यांनी २०१९ मध्ये आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह बिहारमधून मुंबई येथे आले. त्यानंतर ते मरीन इंजिनिअर म्हणून ते मालवाहू जहाजांवर काम करत होते आणि जहाजांच्या तांत्रिक कामकाजाची देखरेख करत होते.

दोन दिवसांपूर्वी इराक जवळील पर्शियन आखातात एका तेल टँकरवर पाण्याखालील ड्रोनने हल्ला केला. स्फोटानंतर जहाजाला मोठी आग लागली. या स्फोटाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये रात्रीच्या अंधारात आगीचा मोठा गोळा दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सिंग हे कच्च्या तेलाच्या टँकर सीफेस विष्णूवर अतिरिक्त मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

ड्रोन हल्ल्यात सिंग गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर जळत्या जहाजातून 15 हिंदुस्थानी खलाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सागरी संस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांनी हल्ल्याची औपचारिक चौकशी सुरू केली आहे. जहाज चालवणाऱ्या शिपिंग कंपनीने सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.