
इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालीबाफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या होर्मुझची सामुद्रधुनी रोखण्याच्या धमकीची खिल्ली उडवली आहे. यासाठी त्यांनी एक गणिती समीकरण समोर ठेवतानाच व्हाईट हाऊसला त्यांच्या परिसरात सध्या वाढत्या पेट्रोलच्या किमतींची आठवण करून दिली. त्यांनी एक गुगल मॅपचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये व्हाईट हाऊसजवळील पेट्रोलच्या सध्याच्या किमतींचा उल्लेख आहे. फोटो शेअर करताना त्यांनी अमेरिकन नागरिकांना असा इशारा दिला की, लवकरच त्यांना जून्या किमतींची ‘आठवण येईल’ (तुम्ही नॉस्टॅल्जिक व्हाल) . सोमवारी संध्याकाळपासून (इराणी वेळेनुसार) इराणच्या बंदरांमध्ये जाणारी सर्व सागरी वाहतूक रोखण्यासाठी अमेरिकन लष्कराने नाकेबंदी सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर इराणकडून अशाप्रकारे अमेरिकेला डिवचण्यात आले आहे.
कालीबाफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले, ‘सध्याच्या पेट्रोल पंपावरील आकड्यांचा आनंद घ्या. या तथाकथित ‘नाकेबंदी’मुळे, लवकरच तुम्हाला ४-५ डॉलर्सच्या पेट्रोलची आठवण येईल (तुम्ही नॉस्टॅल्जिक व्हाल). एवढचं नाही तर त्यांनी एक गणिती समीकरण देखील शेअर केले आहे. ΔO_BSOH>0 ⇒ f(f(O))>f(O) यासोबत गुगल मॅप्सचा स्क्रीनशॉट जोडून त्यांनी अमेरिकन ग्राहकांना भविष्यातील दरवाढीबद्दल सावध केले.
Enjoy the current pump figures. With the so-called ‘blockade’, Soon you’ll be nostalgic for $4–$5 gas.
ΔO_BSOH>0 ⇒ f(f(O))>f(O) pic.twitter.com/rVxlC6vFWG
— محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) April 12, 2026
‘X’ वरील युझर्सच्या मते, या समीकरणाचा अर्थ असा आहे की, जर हॉर्मुझ नाकेबंदीची तीव्रता वाढली (Delta O_{BSOH}>0) तर त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये केवळ साधी वाढ न होता ती (f(f(O))>f(O)) चक्रवाढ पद्धतीने आणि प्रचंड वेगाने वाढेल. म्हणजेच कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्यामुळे किमती वाढतील आणि त्या दबावामुळे किमतीत पुन्हा मोठी वाढ होईल.
ट्रम्प यांचा इशारा
पाकिस्तानमध्ये अमेरिका-इराणमधील युद्धविरामाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिकन नौदल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांची नाकेबंदी त्वरित सुरू करेल. अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) जाहीर केले की, सोमवार सकाळी १० वाजता (EDT) किंवा इराणच्या वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता इराणच्या सर्व बंदरांची नाकेबंदी केली जाईल. ही नाकेबंदी इराणच्या बंदरांवर आणि किनारपट्टीवर येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांसाठी लागू करण्यात येईल. तसेच कोणत्याही प्रकारे पक्षपात करता येणार नाही. परंतु इराणव्यतिरिक्त इतर बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी असेल.
अमेरिकेतील तेलाच्या किमती
ट्रम्प यांनी नाकेबंदीचे आदेश दिल्यानंतर अमेरिकेतील तेलाच्या किमतींनी प्रति बॅरल १०० डॉलर्सचा टप्पा पुन्हा ओलांडला आहे. सुरुवातीला ‘वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट’ (WTI) तेलाची किंमत ८ टक्क्यांनी वाढून १०४.५० डॉलर्सवर पोहोचली, तर ‘ब्रेंट क्रूड’ची किंमत ७ टक्क्यांनी वाढून १०२ डॉलर्स झाली. आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला, तर जपानचा निक्केई ०.३ टक्क्यांनी खाली आला.































































