
पश्चिम आशियातील वाढत्या तणावपूर्ण आणि युद्धसदृश परिस्थितीचा परिणाम फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 28 फेब्रुवारीपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली असून त्याचा थेट परिणाम इराणच्या फुटबॉल संघावर आणि त्यांच्या विश्वचषक मोहिमेवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर जियानी इन्फेंटिनो आणि इराण फुटबॉल संघटनेच्या अधिकाऱयांमध्ये तुकाa येथील अंताल्या येथे झालेल्या बैठकीनंतरही इराणचे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न अद्याप हवेतच आहेत.
इराणच्या वर्ल्ड कप सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झालेल्या परिस्थितीत ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. चर्चेत सकारात्मक संकेत मिळाले असले तरी इराणचे सामने अमेरिकेऐवजी मेक्सिकोमध्ये हलवण्याचा मुद्दा अद्यापि निकाली निघालेला नाही आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठय़ा भूमिकेनंतर तो प्रश्न सुटण्याची शक्यताही कमीच आहे. त्यामुळे सध्या तरी इराणसमोर अमेरिकेत खेळा, अन्यथा बाहेर पडा हा एकमेवच पर्याय उरलेला आहे.
इराणची स्थिती अद्याप अनिश्चित
इराणच्या सहभागाबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. सरकारी पातळीवर संघाच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अमेरिकेत जाण्यास अडचणी येऊ शकतात, असे संकेत देण्यात आले होते. काही स्तरावर इराणचे सामने अन्य देशात, विशेषतः मेक्सिकोमध्ये हलवण्याची मागणीही झाली होती. मात्र फिफाने स्पष्ट केले आहे की, स्पर्धेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही आणि इराणला आपले सामने अमेरिकेतच खेळावे लागतील.
सुरक्षेबाबत चिंता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी इराणच्या सहभागावर आणि खेळाडूंच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली होती. तरीही फिफा आपली भूमिका ठाम ठेवत असून इन्फेंटिनो यांनी इराण संघाला आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.
तयारी सुरूच; पण अडथळे कायम
इराण संघाने कठीण परिस्थितीतही आपली तयारी सुरू ठेवली आहे. जॉर्डनमध्ये होणारे सराव सामने सुरक्षेच्या कारणास्तव अंताल्या येथे हलवण्यात आले, जिथे संघाने नायजेरिया आणि कोस्टारिका विरुद्ध सामने खेळले. या सामन्यांदरम्यान खेळाडूंनी युद्धाविरोधात प्रतीकात्मक आंदोलनही केले, ज्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली.
व्हिसा समस्याही डोकेदुखी
विश्वचषक तयारीसाठी इराण संघ 10 जूनपर्यंत अमेरिकेतील ऑरिझोनातील टक्सन येथे प्रशिक्षण शिबिरासाठी पोहोचणार आहे. 15 जून रोजी लॉस एंजेलिस येथे न्यूझीलंडविरुद्ध त्यांचा पहिला सामना होणार असून त्यानंतर बेल्जियम आणि इजिप्तसारख्या मजबूत संघांशी त्यांची लढत होणार आहे, मात्र व्हिसासंदर्भातील अडचणी अद्यापि कायम असून काही अधिकाऱयांना अमेरिकेत प्रवेश मिळालेला नाही.


























































