खबरदार! तुमचाही शेवट अटळ आहे!! इराणच्या सुरक्षा प्रमुखांचा ट्रम्प यांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचा एकही वार खाली जाऊ द्यायचा नाही, असा निर्धारच इराणने केलेला दिसत असून ट्रम्प यांच्या शाब्दिक हल्ल्यांनाही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जात आहे. ‘‘खबरदार, स्वतःची काळजी घ्या अन्यथा तुमचाही शेवट अटळ आहे,’’ असा कडक इशारा इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांनी ट्रम्प यांना दिला आहे.

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतुकीला अडथळा आणल्यास हल्ले 20 पटींनी वाढवू, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या धमकीला लारिजानी यांनी आज प्रत्युत्तर दिले. ‘‘इराण हे त्यागाची व बलिदानाची परंपरा असलेले राष्ट्र आहे. तुमच्या पोकळ धमक्यांना आम्ही भीत नाही. तुमच्यापेक्षा शक्तिशाली असलेले देशही इराणला संपवू शकलेले नाहीत. त्यामुळे सावध राहा. तुम्हीच नामशेष होणार नाही ना याची काळजी घ्या,’’ असे लारिजानी यांनी ठणकावले.

कोण आहेत लारिजानी?

लारिजानी हे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख आहेत. त्यांचे पद हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या समकक्ष आहे. लारिजानी हे अयातुल्ला अली खामेनी यांच्या विश्वासू शिलेदारांपैकी आहेत. अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणच्या सुरक्षेची सर्व सूत्रे त्यांनी स्वतःकडे घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे अमेरिका व इस्रायलच्या मोस्ट वाँटेड यादीत त्यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे.