
धडाकेबाज गोलंदाजीच्या जोरावर आयर्लंडच्या महिला संघाने थायलंडला 62 धावांनी नमवत महिला टी-20 विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवली. अर्लीन केली आणि लारा मॅकब्राइड यांच्या माऱयापुढे थायलंडचा निभावच लागला नाही. या विजयासह आयर्लंडने बांगलादेश आणि नेदरलँड्सच्या पंक्तीत स्थान मिळवले असून इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱया महास्पर्धेत प्रवेश निश्चित केला. प्रथम फलंदाजी करत आयर्लंडने आठ विकेट गमावत 121 धावा उभारल्या. गॅबी लुईसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि वरच्या फळीने आक्रमक सुरुवात केली. एमी हंटर, लुईस आणि ऑर्ला फ्रेंडरगास्ट यांनी पहिल्या दहा षटकांतच धावांचा वेग वाढवला, मात्र मधल्या टप्प्यात थायलंडच्या फिरकीने काहीसे लगाम घातले. लुईस लिट्ल आणि जेन मॅग्वायर यांनी अखेरच्या षटकांत उपयुक्त भर घालत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
























































