आयपीएलमध्ये भेदक मारा कर, तरच हिंदुस्थानी संघाचे दार उघडेल; शमीला इरफान पठाणचा सल्ला

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड न झाल्यानंतर मोहम्मद शमीला तंदुरुस्तीच्या कारणावरून वारंवार डावलले जात नसल्याचे माजी कसोटीपटू इरफान पठाणने स्पष्ट केले. मात्र, हिंदुस्थानी संघात पुनरागमनाचा मार्ग आयपीएलमधूनच जातो. त्यामुळे आयपीएलमध्ये भेदक मारा कर, टीम इंडियाचे दार उघडेल, असा सल्ला दिलाय.

आपल्या ‘यूटय़ूब’ वाहिनीवर बोलताना इरफान पठाण म्हणाला, ‘शमी हा कुठलाही नवखा खेळाडू नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450हून अधिक विकेट घेतलेल्या गोलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 200 षटके टाकल्यानंतर त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित करणे,  समजण्यापलीकडचे आहे. मी शमीच्या जागी असतो तर आयपीएलमध्ये नव्या चेंडूने असा कहर केला असता की कुणालाही मला दुर्लक्ष करता आलं नसतं.’

देशांतर्गत क्रिकेटमध्ये शमीचा फॉर्मही लक्षवेधी आहे. विजय हजारे करंडकात त्याने पाच सामन्यांत 11 विकेट घेतले असून, बंगालकडील तो सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांत 16 सामन्यांत 38 विकेट टिपलेत आणि 2023 विश्वचषक उपांत्य फेरीतील सात विकेट आजही स्मरणात असल्याचे इरफान म्हणाला.

यंदा आयपीएलमध्ये शमी लखनौकडून खेळताना दिसणार असून हैदराबाद संघाकडून 10 कोटी रुपयांत त्याला मुक्त करण्यात आले होते. आता एनरिच नॉर्खिया, आवेश खान, मयंक यादव आणि मोहित खान यांच्यासह तो लखनौच्या वेगवान माऱयाची धुरा सांभाळणार आहे.