डोळ्यांत अजूनही कसोटीची आग आहे! सिद्धूच्या विनंतीनंतर उथप्पाचीही विराटला साद, कसोटी निवृत्तीचा पुनर्विचार कर, चॅम्पियन!

हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात विराट कोहली हे नाव केवळ आकडे, शतके किंवा विजयांपुरते मर्यादित नाही; ते नाव म्हणजे वेडेपणा, अभिमान आणि लाल चेंडूवरील अधिराज्य. मे 2025 मध्ये विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्या क्षणापासूनच चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे हे खरंच शेवट आहे का? आता त्या प्रश्नाला पुन्हा एकदा भावनिक धार मिळाली आहे. नवज्योतसिंग सिद्धूच्या सादेनंतर माजी कसोटीपटू रॉबिन उथप्पा यांनीही विराटला कसोटी क्रिकेटमध्ये परतण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

निवृत्तीचा निर्णय, पण अपूर्ण वाटणारी कथा

मे 2025 मध्ये इंग्लंड दौऱयापूर्वी विराटने कसोटी क्रिकेटला अलविदा केला. ऑस्ट्रेलिया दौऱयात पर्थ येथे झळकावलेल्या शतकाने त्याने मालिकेची सुरुवात राजेशाही थाटात केली. मात्र पुढील सामन्यांत अपेक्षित सातत्य राहिले नाही आणि हिंदुस्थानला मालिका 1-3 ने गमवावी लागली. त्यानंतरचा निवृत्तीचा निर्णय अनेकांना अचानक आणि वेदनादायी वाटला.

एक फोटो आणि हजार भावना

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी नेट्समध्ये सराव करत असलेल्या विराटचा एक फोटो उथप्पाने सोशल मीडियावर शेअर केला. त्या फोटोखाली लिहिलेली ओळ थेट काळजाला भिडणारी होती. ‘त्याच्या डोळ्यांत अजूनही एक कथा आहे. ही कसोटी निवृत्ती मागे घेण्याचीच वेळ आहे.’ क्षणातच ही पोस्ट व्हायरल झाली. कारण तो फोटो फक्त सरावाचा नव्हता, तर कसोटी क्रिकेटसाठी अजूनही धडधडणाऱया विराटच्या मनाचा आरसा होता.

अजून बरंच बाकी आहे

कसोटी क्रिकेटपासून दूर असतानाही विराटची भूक संपलेली नाही, हे त्याच्या फलंदाजीनेच दाखवून दिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग दोन शतके, विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीसाठी शतक हे सगळे ओरडून सांगतेय की हा फलंदाज अजून थकलेला नाही.

उथप्पाचा ठाम सूर

उथप्पाने याआधीही आपल्या ‘यूटय़ूब’ चॅनेलवर विराट आणि रोहितच्या कसोटी निवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा ठाम विश्वास आहे. हा निर्णय पूर्णपणे स्वाभाविक वाटत नाही. त्यांच्या डोळ्यांत अजूनही कसोटी क्रिकेटची चमक आहे आणि आता सिद्धूच्या भावनिक आवाहनानंतर उथप्पाचीही ही मागणी, विराटच्या मनात नक्कीच विचारांची वादळे निर्माण करणारी ठरू शकते. आज क्रिकेटविश्वातून उठणारा सूर एकच आहे ‘विराट, अजून एकदा पांढऱ्या कपड्यात मैदानात उतर. हिंदुस्थानच्या कसोटी क्रिकेटला तुझी अजूनही गरज आहे!’