
हसन नसरल्लाहनंतर हिजबुल्लाचा नवा उत्तराधिकारी हाशिम सैफुद्दीनचाही इस्त्रायलने खात्मा केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बेरुत येथील हवाई हल्ल्यात त्याचा खात्मा करण्यात आला होता. प्रमुख मारला गेल्याने हिजबुल्लाह हादरला असून प्रत्युत्तर करण्याची क्षमता कमी झाली आहे.
तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा कार्यकारी परिषदेचा प्रमुख हाशिम सैफुद्दीन, हिजबुल्लाहच्या गुप्त निदेशालयाचा प्रमुख अली हुसैन आणि हिजबुल्लाह कमांडर यांचा खात्मा करण्यात आला. इस्त्रायली सेनेने एका निवेदनात दुजोरा दिला आहे. 4 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात सैफुद्दीन याचा खात्मा करण्यात आला. आपला प्रमुख मारला गेल्याने हिजबुल्लाहला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सैफुद्दीनच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बेरुत येथे मंगळवारीही इस्त्रायलने मोठा हल्ला केला होता.
दरम्यान, इस्त्रायलच्या सैनिकांनी बेरुतमध्ये हिजबुल्लाहची मोठी संपत्ती मिळाल्याचा दावा केला आहे. एका रुग्णालयाच्या खाली असलेल्या बंकरमध्ये कोट्यावधींचे सोने आणि रोकड मिळाले. या बंकरला बराच काळ लपविण्यासाठी डिझाईन केले होते. ठार झालेले हिजबुल्लाह नेते सैय्यद हसन नसरल्लाहने अल सहेल रुग्णालयाच्या खाली बंकर बनवला होता, असे इस्त्रायलचे मुख्य लष्कर प्रवक्ते रिअल अॅडमिरल डॅनिअल हगारी यांनी सांगितले.