Israel Iran War – युद्ध होर्मुझपर्यंत पोहचले; इराणचे टोल वसुलीचे ठिकाण असलेल्या केशम बेटावर अमेरिकेचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल- इराण युद्ध आता होर्मुझच्या सामुद्रधुनीपर्यंत पोहोचले आहे. या मार्गावर इराणचे प्राबल्य आहे आणि जहाजांकडून वसुलीसाठी त्यांनी टोलनाका उभारला आहे. आता अमेरिकेने वसुलीचे ठिकाण असलेल्या केशम बेटावर बॉम्बहल्ला केला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणच्या केशम बेटावरील बंदराच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याची पुष्टी उपग्रह प्रतिमांनी केली आहे.

रॉयटर्सने कोपर्निकस सेंटिनेल-२ प्रतिमांचा हवाला देत वृत्त दिले की, गुरुवारी बेटावरील बंदर परिसरातून धूर निघताना दिसला. रॉयटर्सने बंदराच्या आराखड्याची विद्यमान फाइल छायाचित्रे आणि उपग्रह डेटाशी जुळवणी करून या जागेची पुष्टी केली. अमेरिकी सैन्य केशम बेटावर धुमाकूळ घालत आहे.

इराणसाठी, होर्मुझची सामुद्रधुनी या युद्धात एक प्रमुख सामरिक ठिकाण आहे. केशम बेट याच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये वसलेले आहे. सध्या, जहाजे केवळ आयआरजीसीच्या (IRGC) परवानगीनेच केशम बेटावरून जातात. पण आता अमेरिकेने याच बेटावर हल्ला केला आहे. केशम बेटावरच इराण जहाजांकडून टोल वसूल करतो. त्यामुळे हा त्यांचा प्रमुख आर्थिस स्रोत आहे.

बहमन व्यावसायिक बंदर आणि दोहा मासेमारी धक्क्याच्या काही भागांचे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, १ एप्रिलच्या संध्याकाळ ते २ एप्रिलच्या दुपारच्या दरम्यान केशम बंदराच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सने (IRGC) जाहीर केले आहे की, इराणी हवाई संरक्षण प्रणालीने केशम बेटावर एका शत्रूच्या लढाऊ विमानाला यशस्वीरित्या लक्ष्य केले आहे. इराणचे सरकारी माध्यम, प्रेस टीव्हीनेही या हल्ल्याच्या प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत. तथापि, अमेरिकेने म्हटले आहे की इराणने त्यांच्या कोणत्याही लढाऊ विमानाला लक्ष्य केले नाही आणि इराणचा दावा खोटा आहे. अमेरिकेने म्हटले आहे की इराणच्या IRGC ने सहा वेळा खोटे बोलले आहे. इराणने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक विमान खाली पडताना दाखवले आहे.

केशम बेट हे इराणचा प्रमुख आर्थिक स्रोत आहे. समुद्रात जिथे इराण टोल कर गोळा करतो, ते ठिकाण लारक आणि केशम बेटांच्या मध्ये आहे. जहाजे या दोन बेटांमधून जातात आणि तेव्हापासूनच इराणने या जहाजांकडून टोल कर गोळा करण्यास सुरुवात केली.

या मार्गातून जाण्यासाठी जहाजांना इराणी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. ज्या देशांशी इराणचे चांगले संबंध आहेत, त्या देशांच्या जहाजांना इराण या मार्गातून जाण्याची परवानगी देत ​​आहे. काही तेलवाहू जहाजांना या मार्गातून जाण्यासाठी २ दशलक्ष डॉलर्सचा टोल कर भरावा लागतो. आता, अमेरिका आणि इस्रायलने याच केशम बेटावर हल्ला केला आहे.

इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने असेही वृत्त दिले आहे की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. केशम फ्री झोनचे उपप्रमुख मन्सूर अझीमझादेह अर्देबिली म्हणाले की, बहमन बंदर ही पूर्णपणे एक व्यावसायिक सुविधा आहे आणि त्यावर कोणताही हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन मानला जाईल.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इराणला सातत्याने धमक्या देत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जर इराणने करार केला नाही, तर इराणची सर्व पायाभूत सुविधा नष्ट केली जाईल. गुरुवारी, अमेरिकेने इराणचा सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त केला. ‘ट्रुथ पोस्ट’वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले, इराणचा सर्वात मोठा पूल कोसळला आहे आणि तो पुन्हा कधीही वापरला जाणार नाही. अजून बरेच काही घडायचे बाकी आहे! खूप उशीर होण्यापूर्वी इराणने आता करार करण्याची वेळ आली आहे.