
अमेरिका, इस्रायल-इराण युद्धामुळे जागातिक बाजारात तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जगावर गंभीर उर्जासंकट ओढवले आहे. या सर्व परिस्थितीची विचार करता आणि ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात अडकलेल्या रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदीला परवानगी देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे रशियाने स्वागत केले आहे. रशियाने स्पष्टपणे म्हटले आहे की आमच्या मदतीशिवाय जागतिक ऊर्जा बाजारपेठेत कच्च्या तेलाचा किमती स्थिर ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे रशियानेही अमेरिकेचा निर्णय योग्य असल्याचे सांगत त्याचे स्वागत केले आहे.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, जग सध्या गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करत आहे आणि रशियन तेलाच्या मोठ्या प्रमाणात उपलब्धतेशिवाय बाजारपेठ स्थिर करणे अशक्य आहे. ते म्हणाले, रशियन तेलाच्या मोठ्या प्रमाणात उपलब्धतेशिवाय बाजारपेठ स्थिर करणे अशक्य आहे. अमेरिका ऊर्जा बाजारपेठ स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या बाबतीत आमचे हितसंबंध देखील जुळतात. त्यासाठी रशियाची मदत लागणार आहे. तसेच तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आम्हीही प्रयत्न करत असल्याचे रशियाने स्पष्ट केले.
इराण संकटामुळे युक्रेन शांतता चर्चेत अमेरिकेचा रस कमी होईल असे त्यांना वाटत नाही. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, सध्या रशियाला इराण संकटामुळे युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अमेरिकेचा रस कमी होईल याची चिंता नाही. रशियाचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकन प्रशासनाने समुद्रात अडकलेल्या रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्यासाठी देशांना 30 दिवसांचा विशेष परवाना जारी केला आहे.
जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तेलाचे भाव वाढत असताना अमेरिकेने घेतलेला हा निर्णय योग्य आहे, असे रशियाने स्पष्ट केले. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी सांगितले की जागतिक ऊर्जा बाजारपेठ स्थिर करण्यासाठी आणि तेलाच्या किमतींमध्ये अचानक वाढ नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पेक्षा जास्त झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला, जो जवळजवळ चार वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. बेसंट यांनी असेही स्पष्ट केले की या तात्पुरत्या परवानगीमुळे रशियन सरकारला कोणताही महत्त्वपूर्ण आर्थिक फायदा होणार नाही.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले हल्ले आणि त्यानंतर तेहरानच्या प्रतिसादामुळे मध्य पूर्वेतील तणावात तीव्र वाढ झाली आहे. या तणावाचा थेट परिणाम होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या सागरी व्यापारावर झाला आहे, जो जगाच्या तेल आणि वायू पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

























































