
युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्याची चर्चा सुरू असतानाच इस्रायलने शनिवारी गाझामध्ये मोठा हल्ला केला. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये युद्धबंदी झाल्यानंतर आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असून यात 23 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत.
इस्रायली सैन्याने गाझा शहरातील एक अपार्टमेंट आणि एका शिबिराला लक्ष्य केले. इस्रायलने शनिवारी पहाटेच बॉम्बवर्षाव केला. यात मरण पावलेल्यांमध्ये दोन महिलांसह 6 लहान मुलांचाही समावेश आहे. इस्रायलच्या सैन्याने या हल्ल्यावर अद्याप अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
चार महिन्यांत 500 हून अधिक बळी
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि हमासमध्ये मागील वर्षी 10 ऑक्टोबर रोजी युद्धबंदी झाली होती. मात्र, त्यानंतरही इस्रायलकडून हल्ले सुरूच राहिले. या सगळ्या हल्ल्यांत आतापर्यंत 500 हून अधिक लोक मरण पावले आहेत.























































