युद्धाचा भडका उडणार; इस्रायलचा इराणच्या सहा अणुकेंद्रांवर हल्ला, 200 लढाऊ विमानांतून क्षेपणास्त्रांचा मारा

आखातात शुक्रवारी युद्धाची स्थिती निर्माण झाली. इस्रायलने भल्या पहाटे इराणच्या दोन लष्करी छावण्या आणि चार आण्विक केंद्रांवर जोरदार हवाई हल्ले केले. त्यात लष्करी छावण्या व आण्विक केंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. इस्रायलने तब्बल 200 लढाऊ विमानांतून लागोपाठ क्षेपणास्रे डागली आणि इराणला हादरवून सोडले. हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या सहा अणुशास्त्रज्ञ, लष्कर व हवाई दलाच्या 20 वरिष्ठ कमांडर्ससह 104 ठार, तर 376 जण जखमी झाले. हे इराणविरोधात सुरू केलेले ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ आहे. इस्रायलला असणारा धोका पूर्णपणे निपटून काढल्याशिवाय हे ऑपरेशन थांबणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जाहीर केले. आखातात भडकलेल्या या संघर्षाने जगाची चिंता वाढवली आहे.

स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी सर्वात आधी इराणची राजधानी तेहरानमध्ये स्पह्ट झाले. सुरुवातीच्या हवाई हल्ल्यानंतर काही वेळातच नतान्झ आण्विक केंद्रात स्पह्ट झाला. इराणचे हे आण्विक केंद्र राजधानी तेहरानपासून दक्षिणेला 225 किलोमीटर अंतरावर आहे. भल्या पहाटे 200 लढाऊ विमानांमधून क्षेपणास्रे डागून इस्रायलने इराणला दणका दिला. इस्रायलने 4 मोठे अणुऊर्जा प्रकल्प आणि दोन लष्करी छावण्यांना टार्गेट केले. तसेच शस्त्र बनवण्यास सक्षम असलेला कारखाना आणि बडय़ा लष्करी अधिकाऱयांचे निवासी संकुल उद्ध्वस्त करण्यात आले. हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख, विशेष दल प्रमुख, 2 प्रमुख अणुशास्त्रज्ञांसह 5 उच्च अधिकारी ठार झाले. इराण अणुबॉम्ब बनवणार होता. इस्रायलला संपवण्याचे कारस्थान इराणने रचले होते. इराणकडे 15 अणुबॉम्ब बनवण्याइतके युरेनियम आहे. इराणचा अणुबॉम्ब बनवण्याचा इरादा उधळवून लावण्यासाठीच ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ हाती घेऊन इराणवर हल्ला केला, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ल्यानंतर जाहीर केले.

तीन दिवसांपूर्वी इराणला मिळाला होता इशारा!

इस्रायल-इराणमधील युद्धामुळे मध्य पूर्वेकडील तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्रायल हवाई हल्ले करणार असल्याचा इशारा इराणला दोन-तीन दिवस आधीच मिळाला होता. इस्रायलचे हल्ले परतवून लावण्याइतपत सक्षम हवाई संरक्षण प्रणाली इराणकडे आहे. असे असूनही इराणला इस्रायलचा हल्ला रोखण्यात यश आले नाही. इराणला अण्वस्त्रs बनवू न देण्यासाठी इस्रायल अनेक वर्षांपासून इशारा देत आहे.

नेतान्याहू यांचा मोदींना फोन

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना इराणसोबतचा संघर्ष तसेच आखातातील परिस्थितीची माहिती दिली. नेतन्याहू लवकरच ट्रम्प आणि पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत.

या सहा ठिकाणी केले हवाई हल्ले
– नतान्झ येथील आण्विक केंद्र.
– तेहरानमधील इराणची अणुऊर्जा संघटना.
– इस्फहान येथील अणु तंत्रज्ञान केंद्र.
– अरक येथील अणुभट्टी
– तब्रिझ येथील लष्करी तळ आणि मोठा तेल शुद्धीकरण कारखाना
– इराकची राजधानी बगदादजवळील केरमानशाह ठिकाण.

– इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे हादरलेल्या इराणनेही पलटवार करण्याचा प्रयत्न केला. दुपारच्या सुमारास इराणने इस्रायलला प्रत्युत्तर देताना 100 हून अधिक ड्रोन डागले.