
इस्रायल-इराण युद्धात अमेरिका आपला मित्र इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. इस्रायलचे सुरक्षा कवच आणखी मजबूत करण्यासाठी अमेरिकेने आपली अँटी मिसाईल यंत्रणा इस्रायलच्या मदतीसाठी पाठवली आहे. टर्मिनल हाय अल्टिटय़ूट एरिया डिफेन्स (THAAD) असे या यंत्रणेचे नाव आहे. क्षेपणास्त्राचे हल्ले रोखण्यासाठी ही मदत पुरवण्यात आली आहे. यासाठी अमेरिकन तुकडी इस्रायलला जाणार आहे. इराणसाठी ही धोक्याची घंटा आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सूचनेनुसार संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी टर्मिनल हाय अल्टिटय़ूट एरिया डिफेन्स प्रणाली इस्रायलमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला. 1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर 180 मिसाईल सोडली होती. याची गंभीर दखल अमेरिकेने घेतली आहे. टर्मिनल हाय अल्टिटय़ूट एरिया डिफेन्स ही मिसाईल रक्षा प्रणाली आहे. बॅलिस्टीक मिसाईल रोखण्यासाठी रचना केलेली आहे. ही रचना छोटे-मोठे किंवा कमी पल्ल्याचे मिसाईल हल्ले परतवायला उपयुक्त आहे. THAAD एका मोठय़ा क्षेत्राला कव्हर करते.
200 किमीपर्यंतच्या शत्रूची खैर नाही
अगदी 150 ते 200 किमी अंतरावरील शत्रूला लक्ष्य करू शकते. प्रत्येक THAAD प्रणालीत सहा ट्रक-माऊंटेड लाँचर, इंटरसेप्टर आणि रडार यांचा समावेश असतो आणि त्याच्या संचालनासाठी 95 सैनिकांची आवश्यकता असते. अमेरिकडे सध्या सात THAAD आहेत. मिसाईलपासून रक्षणाच्या अमेरिकेच्या रणनीतीचा हा महत्त्वाचा भाग आहे.