
आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रीसिजन स्टेजमध्ये हिंदुस्थानच्या दिव्या टी.एस. हिने स्थिर खेळ करीत अव्वल आठमध्ये स्थान टिकवून ठेवत अंतिम फेरीच्या शर्यतीत आपली दावेदारी कायम ठेवली आहे. मात्र हिंदुस्थानच्या सम्राट राणाला पुरुष 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेची फायनल गाठण्यात ‘इनर 10 एस’च्या आधारावर पराभव पत्करावा लागला. उद्या (11 सप्टेंबर) होणाऱ्या रॅपिड फायर स्टेजनंतर अंतिम फेरीतील चित्र स्पष्ट होणार आहे.
एपीएम पात्रतेत राणाने 582-20 एक्स असा स्कोअर नोंदविला. त्याने सहा शॉट्समध्ये 96, 98, 92, 95, 99 आणि 97 असे गुण मिळविले होते, मात्र इराणच्या वाहिद गोलखंडनने 582-25 एक्स मारत आठव्या स्थानावर झेप घेतली आणि इनर 10 एसमध्ये फक्त 5 ने राणा पिछाडीवर पडला. त्यामुळे तो दहाव्या स्थानी राहिला.
इतर हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये अमित शर्मा 576-18 एक्स(97, 96, 97, 93, 98, 95) सह 28 व्या स्थानी, तर निशांत रावत 568-11 एक्स (97, 97, 95, 91, 92, 96) सह 42 व्या स्थानी राहिले. अंतिम फेरीत चीनच्या आशियाई विजेत्या काई हूने 242.3 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. 2025 मधील हे त्याचे पाचवे वरिष्ठ सुवर्णपदक ठरले.