
मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी तरुण-तरुणींना खासगी क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना प्रणीत स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे शिवसेना भवन येथे रोजगार प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन महिन्यांचे हे प्रशिक्षण वर्ग असून आठवडय़ातून दोन दिवस सायंकाळी 6 ते 8.30 वाजेपर्यंत हे विशेष प्रशिक्षण व रोजगार संधी वर्ग आयोजित केले जातील.
मराठी तरुण-तरुणींना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळावी यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने रोजगार केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून तरुणांना केवळ प्रशिक्षणच दिले जाणार नाही, तर यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मराठी मुलांनी गुणवत्तेच्या जोरावर खासगी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आपली मोहोर उमटवावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सदर अभ्यास वर्गात करीअरच्या संधी, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबी व त्याची तयारी, अभ्यासक्रम, मुलाखत अशा विविध टप्प्यांची माहिती देण्यात येईल. तरी या सुवर्णसंधीचा लाभ जास्तीत जास्त युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे करण्यात आले आहे.
लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट
एमएमआरमधील दोन विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, भिवंडी गोदाम, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा औद्योगिक पट्टा, जहाज पंपन्यांची मुख्यालये यात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच केंद्राच्या अनेक योजनेअंतर्गत व्यवसायाचीही संधी अगणित आहे. कस्टम क्लिअरिंग, लॉजिस्टिक वेअर हाऊसिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि बंदर पोर्ट क्षेत्रात वाढणाऱया संधी लक्षात घेऊन प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे.
प्रशिक्षण वर्गासाठी एकावेळी एकाच बॅचसाठी फक्त 30 प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व मुलाखत प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच प्रवेश मिळेल. या क्षेत्रातील रोजगार व्यवसायासाठी उमेदवार किमान बारावी ते पदवीधर, पदव्युत्तर, उच्चशिक्षित असावा.
प्रशिक्षण वर्गासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीसाठी शिवसेना भवन, पहिला मजला, दादर पश्चिम येथे किंवा 9892699215, 9869588469, 9619118999, 9867634856, 9869046036, 9969526090, 9867634856, 9664104686, 9821870441 या क्रमांकावर संपर्क साधावा.



























































