शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी बाब; सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारले

शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाच्यावतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी आंदोलनस्थळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे मत व्यक्त केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज शिक्षकांच्या मागण्यांसाठी विधान भवनात सरकारशी चर्चा करू. जर काही निर्णय घेत नसतील तर मी उद्या दिवसभरात तुमच्या सोबत असेल, रोहित पवार विधानभवनात आहेत, त्यांना मी याबद्दल सरकारशी बोलण्यास सांगणार आहे. मी दोन-तीन शिक्षकांना सोबत घेऊन विधानभवनात जात आहे. उद्या मी शरद पवार यांची आणि तुमची भेट घालून देते, शांततेच्या मार्गाने चर्चेला बसुया , तुमच्या सुखदुःखांना सरकारला वेळ नाही. आज शरद पवार साहेब रायगडमध्ये आहेत. आपल्याला या विरोधात लढावं लागणार आहे. आझाद मैदानावर बसून काही होणार नाही. मागणी मान्य नाही झाले तर विधानभवनात येईल असे सुप्रियाताई सुळे यांनी शिक्षकांशी बोलताना म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शक्तीपीठ महामार्गासाठी 82,000 कोटी खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण मायमराठीच्या गरीब, कष्टकरी शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत? मी या सरकारचा जाहीर निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत रयतेचं राज्य स्थापन केलं होतं पण सध्या महाराष्ट्रात रयतेचं नव्हे, तर
दलालांचं राज्य आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, तो मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी व टिकवण्यासाठी होता. प्रत्येक गाव, वाडी-वस्तीत मुला-मुलींना त्यांच्या अधिकारांचे शिक्षण मिळाले पाहिजे. हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकाला दिला आहे. शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.