
बोस्निया व हर्जेगोवीनाच्या टिया कोवासेविक, एलिना नेपली यांनी आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, दुहेरीत कझाकस्तानच्या झिबेक कुलंबायेवा व रशियाच्या एकतेरिना याशिना यांनी विजेतेपद संपादन केले.
छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत उपांत्य फेरीत बोस्निया व हर्जेगोवीनाच्या टिया कोवासेविक हिने कझाकस्तानच्या अव्वल मानांकित झिबेक कुलंबायेवाचा ७-५, ६-७ (३), ७-६ (४) असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना ३ तास २२ मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व अकराव्या गेममध्ये टिया हिने झिबेकची सर्व्हिस रोखली व हा सेट ७-५ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये झिबेक हिने जोरदार कमबॅक करत टियाविरुद्ध हा सेट ७-६ (३) असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये टिया हिने आपला खेळ उंचावत हा सेट झिबेकविरुद्ध ७-६ (४) असा जिंकून विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत झील देसाई हिने माघार घेतल्यामुळे एलिना नेपली हिला पुढे चाल देण्यात आली.
दुहेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित कझाकस्तानच्या झिबेक कुलंबायेवा व रशियाच्या एकतेरिना याशिना यांनी तिसऱ्या मानांकित जर्मनीच्या एनास्तासिया कुपारेव व उझबेकिस्तानच्या सेव्हिल युलदाशेवा यांचा ६-१, ६-४ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
स्पर्धेत दुहेरीतील विजेत्या जोडीला करंडक, डॉलर ९५० व १५ गुण, उपविजेत्या जोडीला करंडक, डॉ लर ५५० व ८ गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एन्ड्युरन्स ग्रुपच्या संचालिका वर्षा जैन, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड (आयपीएस), नाथ व्हॅली स्कूलचे संचालक रणजीत दास, एन्ड्युरन्सचे उपाध्यक्ष रोहन जैन, तारिका जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड. आशुतोष मिश्रा, कॅप्टन कवी कंबन, एन्ड्युरन्स ग्रुपचे अभिनव मिश्रा, रामय्या कोंकट्टी व प्रवीण गायसमुद्रे, आयटीएफ सुपरवायझर सुप्रिथ कडवागिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल – उपांत्य फेरी – एकेरी – महिला –
एलिना नेपली (४) पुढे चाल वि. झील देसाई (२) (हिंदुस्थान); टिया कोवासेविक (बोस्निया व हर्जेगोवीना) वि.वि. झिबेक कुलंबायेवा (१) (कझाकस्तान) ७-५, ६-७ (३), ७-६ (४). दुहेरी : अंतिम फेरी : झिबेक कुलंबायेवा (कझाकस्तान) / एकतेरिना याशिना (१) वि.वि. एनास्तासिया कुपारेव (जर्मनी) (३) सेव्हिल युलदाशेवा (उझबेकिस्तान) ६-१, ६-४.































































