कैद्यांच्या ‘जेल प्रीमियर लीग’चा थरार, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी स्पर्धा

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे कैद्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आयपीएलच्या धर्तीवर जेल प्रीमियर लीग (जेपीएल) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. मथुरा तुरुंग अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून तुरुंगाच्या आवारात ही स्पर्धा पार पडली. कैद्यांना तुरुंगाच्या भिंतींमध्ये असलेल्या त्यांच्या दैनंदिन कामातून विश्रांतीचे क्षण अनुभवता यावेत यासाठी जेपीएलचे आयोजन करण्यात आल्याचे तुरुंग अधीक्षक अंशुमन गर्ग यांनी स्पष्ट केले. तुरुंगातील अनेक कैद्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

एप्रिल 2025 मध्ये सुरू झालेल्या जेपीएलमध्ये आठ संघांचा समावेश होता. कैद्यांनी खेळाडू म्हणून आपापल्या संघांचे प्रतिनिधित्व केले. चार-चार संघांना दोन गटांत विभागण्यात आले होते. साखळी फेरीत एकूण 12 सामने खेळले गेले आणि त्यानंतर दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. कॅपिटल्स आणि नाईट रायडर्स यांच्यातील अंतिम सामन्याने स्पर्धेचा शेवट झाला. नाईट रायडर्सने अंतिम लढतीत विजय मिळवत जेतेपद पटकावले. गट अ मध्ये चार संघ आणि गट ब मध्ये चार संघ होते. उपांत्य फेरीतील विजेत्या संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात नाईट रायडर्सने बाजी मारली. कैदी कौशलला दुहेरी सन्मान मिळाला. त्याला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार मिळाले.