
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका रशियन छायाचित्रकाराने फोटोशूटसाठी एका वृद्ध हत्तीला भडक गुलाबी रंगाने रंगवल्याचा प्रकार समोर आल्याने वाद निर्माण झाला होता. डिसेंबर 2025 मध्ये जूलिया बुरुलेवा या रशियन आर्टिस्टने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, जे आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. या फोटोशूटमध्ये ‘चंचल’ नावाच्या 65 वर्षीय हत्तीणीला एका बाजूने गुलाबी रंगाने माखलेले दाखवण्यात आले आहे. या कृतीवर नेटीझन्सनी तीव्र संताप व्यक्त केला असून, प्राण्यांच्या अशा प्रकारे होणाऱ्या व्यापारी वापराच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, फोटोशूटमध्ये सहभागी असलेल्या या हत्तीणीचा गेल्या फेब्रुवारी महिन्यात मृत्यू झाला आहे. हत्तीच्या मालकाने आणि ‘हाथी गाव’ समितीने दिलेल्या माहितीनुसार, चंचलचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे आणि वृद्धत्वामुळे झाला असून त्याचा फोटोशूटशी कोणताही संबंध नाही. मालक सादिक खान यांनी स्पष्ट केले की, फोटोशूटसाठी केवळ 10 मिनिटे नैसर्गिक ‘गुलाल’ वापरला होता आणि तो लगेच धुवून टाकला होता. स्थानिक अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत चौकशी सुरू केलेली नाही, परंतु छायाचित्रे आणि मृत्यूची वेळ एकाच काळात आल्याने सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे.
या घटनेनंतर प्राणी हक्क संघटनांनी, विशेषतः ‘पेटा’ (PETA) इंडियाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेटा इंडियाच्या उपाध्यक्ष खुशबू गुप्ता यांनी सांगितले की, हत्तींना अशा प्रकारे रंगवणे आणि व्यावसायिक कामांसाठी वापरणे हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. हिंदुस्थानातील पाळीव हत्तींना साखळदंडाने बांधून ठेवले जाते, ज्यामुळे ते तणावाखाली असतात. या पार्श्वभूमीवर, जयपूर आणि इतर पर्यटन स्थळांवर हत्तींच्या सफारीऐवजी इलेक्ट्रिक वाहने किंवा रोबोटिक हत्तींचा वापर करावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

























































