देश-विदेशतील महत्त्वाच्या बातम्या

उमर खालिद, शरजील इमाम यांना कोर्टाचा झटका

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उमर खालिद, शरजील इमाम, गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, मोहम्मद सलीम खान, शिफा उर रहमान, अतहर खान, अब्दूल खालिद सैफी, शादाब अहमद यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्यास 19 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. हे सर्व जण 2020 पासून अटकेत आहेत. न्यायाधीश अरविंद पुमार आणि न्यायाधीश एनवी अंजारिया यांच्या खंडपीठाने ही स्थगिती दिली. या आरोपींनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. दिल्ली हायकोर्टाने खालिद सह नऊ आरोपींना जामीन देण्यास नकार दिला होता.

ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना 27 वर्षांची शिक्षा

ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांना सत्ताबदलासाठी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवत त्यांना 27 वर्षे  शिक्षा सुनावली. सुप्रीम कोर्टातील 5 पैकी 4 न्यायाधीशांनी त्यांना दोषी ठरवले. 70 वर्षीय बोल्सोनारो यांनी 2022 मध्ये निवडणुकीतील पराभवानंतर नवे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला दा सिल्वा यांचे सरकार पाडण्यासाठी कट रचला होता. या कटासाठी त्यांना 43 वर्षांची शिक्षा झाली असती. परंतु, त्यांचे वय आणि आरोग्य ध्यानात ठेवून 27 वर्षे 3 महिन्यांची शिक्षा ठोठावली.

पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राची 41 कोटींची मदत

पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंधमध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 21.5 लाखांहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानला 41.5 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. जूनपासून आतापर्यंत पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि वेगवेगळ्या दुर्घटनेत 900 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रिटनने अमेरिकेतील राजदूतांना हटवले

ब्रिटनने अमेरिकेतील राजदूत पीटर मेंडेलसन यांना तडकाफडकी पदांवरून हटवले आहे. मेंडलसन यांचे नाव  कुप्रसिद्ध लैंगिक गुन्हेगार जेफरी एप्स्टीनशी जोडण्यात आल्यानंतर पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यावर दबाव वाढला होता. अमेरिकी खासदारांनी नुकतेच एप्स्टीनचे एक कथित बर्थ डे बुक जारी केले होते. त्यामध्ये मेंडेलसन यांनी हाताने लिहिलेली एक नोट होती. त्यात एप्स्टीनसंबंधी लिहिले होते की, माय बेस्ट पाल. म्हणजेच माझा खास दोस्त, असे होते.