
जळगावमध्ये अमळनेरजवळ मालगाडी रुळावरुन घसरल्याने सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले.
ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. रेल्वे अधिकारी याबाबत तपास करीत आहेत. अमळनेर स्थानकापासून काही अंतरावर कोळसा वाहून नेणारी मालगाडी घसरली. सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग बंद करण्यात आला आहे. अपघातग्रस्त मालगाडी ट्रॅकवरून हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे.