प्रजासत्ताक दिनी सन्मानित झालेल्या 2 विद्यार्थिनींचा विहिरीत ढकलल्याने मृत्यू, जळगावातील साक्री गावात शोककळा

फाईल फोटो

प्रजासत्ताक दिनी सन्मानित झालेल्या दोन विद्यार्थिनींना विहिरीत ढकलल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना जळगावमध्ये घडली. भुसावळ तालुक्यातील साक्री गावात सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला.  टय़ूशनसाठी निघालेल्या नववीतील दोन विद्यार्थिनींचे मृतदेह गावाजवळील विहिरीत आढळून आले. याप्रकरणी संशयावरून रोहन नरेंद्र चौधरी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने दोघींना विहिरीत ढकलल्याची कबुली दिली आहे.

साक्री येथील जनता हायस्कूलमध्ये लक्ष्मी महाजन आणि नयना चौधरी या दोघी नववीच्या वर्गात शिकत होत्या. सोमवारी सकाळी लक्ष्मी आणि नयना दोघीही टय़ूशनसाठी घरातून निघाल्या, मात्र त्या टय़ूशनला गेल्याच नाहीत. टय़ूशनच्या शिक्षकांनी घरी कळवल्यानंतर दोघींचा शोध सुरू करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी 7.45 वाजता एका दुचाकीवर एक तरुण व दोन मुली जाताना दिसून आल्या. मात्र अंतर अधिक असल्याने वाहन क्रमांक आणि तरुणाची ओळख स्पष्ट होऊ शकली नाही. शोधाशोध करत असताना गावाजवळील सोपान महादेव फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ दोघींच्या स्कूलबॅग आढळल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक फेगडे यांच्या शेतात दाखल झाले. गावातीलच मुकेश कोळी यांनी विहिरीत उतरून मृतदेहांचा शोध घेतला. दुपारी 12 वाजता लक्ष्मी महाजनचा मृतदेह सापडला. त्यानंतर दोन वाजता नयना चौधरीचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला.

आरोपी रोहन चौधरी पोलिसांच्या ताब्यात

रोहन चौधरी याने ‘मी दोघींना विहिरीत ढकलले,’ अशी कबुली दिली. त्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनास्थळी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात येत होती. काही ग्रामस्थांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. मात्र पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.