Jalna Banjara Protest – बंजारा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी

हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी 15 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील बांधव सहभागी झाले होते. हा मोर्चा शहरातील मंमादेवी मंदिर चौक ते अंबड चौफुली दरम्यान काढण्यात आला. मंमादेवी मंदिर चौक येथून मोर्चा सुरू झाला आणि पुढे मस्तगड, गांधी चमन, शनी मंदिर, उड्डाण पूल, नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुली आणि पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाबाबत नुकताच हैदराबाद स्टेट गॅझेटचा आधार घेऊन GR काढला आहे. या पार्श्वभूमीवर बंजारा समाज हा हैदराबाद स्टेट गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत असताना भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्रात बंजारा समाजाचा विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करण्यात आला.

आंध्रप्रदेश, तेलंगणा प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी आज मस्तगड येथून मोर्चास सुरुवात झाली. पुढे गांधी चमन, शनी मंदिर, नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुलीवर मोर्चाचे विराट सभेत रुपांतर झाले. मोर्चात जिल्ह्यातील लाखो महिला, तरूण, आबालवृद्ध समाज बांधव पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले.

मोर्चात बंजारा समाजातील राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा, तांड्यातील प्रतिकृती, बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे भजनी मंडळ, वाद्यवृंद, पारंपरिक वेशभूषेत महिला, समाजबांधव मागण्यांची फलके घेऊन सहभागी झाले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.