मोबाईल व पैशासाठी केला होता नांदेडच्या तरुणाचा खून, जालना बसस्थानकातील खुनाचे गूढ उकलले

जालना बसस्थानक परिसरातील खून प्रकरातील मयताची ओळख पटवून पोलिसांनी आरोपीस अटक केली. मृताकडील मोबाईल व पैसे चोरण्याचा प्रयत्न करताच त्याने प्रतिकार केल्याने त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

जालना बसस्थानक परिसरात अनोळखी पुरुषास गळा आवळून व डोक्यात मारून ठार केल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. संतोष गंगाराम जाधव यांनी 10 जून रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी पथक तयार केल्याने मारेकऱ्याचा शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीची ओळख पटवली असता त्याचे नाव आबासाहेब विठ्ठलराव घोडके (58) रा. भवानीनगर, जालना असे असल्याने त्यास त्याच्या घरातून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की, आरोपीने मयताकडील मोबाईल व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मयताने प्रतिकार केल्याने आरोपीने त्याचा गळा आवळून त्याचा खून केला आहे. मयताची तांत्रिक साधनाच्या मदतीने ओळख पटविली असता मयताचे रामेश्वर दत्ताराव पवार (28) रा. गट नं.02, तरोडा ब्रद्रुक, हनुमान मंदीराच्यापाठीमागे, लक्ष्मीनारायणनगर, नांदेड असे असल्याची माहिती मिळाली.

सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, संभाजी तनपुरे, प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, कैलास खार्डे, जगदीश बावणे, दिपक घुगे, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, योगेश सहाणे, सोपान क्षिरसागर, चापोशि. सौरभ मुळे, अशोक जाधवर स्था.गु.शा. जालना व पोलीस अंमलदार संदीप मांटे, सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.