
जालना शहरातील एका खाजगी बाल रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत असलेल्या एका 24 तरुणीचे त्याच ठिकाणी कार्यरत असलेल्या अमोल जगन्नाथ तांगडे (रा. वझर सराटे, ता. जालना) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अमोल तांगडे याने त्या तरुणीवर रुग्णालयात, तसेच ती राहत असलेल्या लक्ष्मीनारायणपुरा भागातील खोलीत आणि स्वतःच्या खोलीमध्ये बोलावून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवलेले आहेत. सदर तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता, तू माझ्या जातीची नाहीस, मागासवर्गीय आहेस, असे म्हणून त्याने तिच्यासोबत लग्नाला नकार दिला होता. त्यांनतर तो स्वतःचा मोबाईल बंद करून, जालना शहरातून गायब झाला होता. दरम्यान, सदर तरुणीने आपल्या आई-वडीलांसह सोमवारी रात्री कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी अमोल तांगडे याच्याविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रॉसीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी करीत आहेत. पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांच्यासह पिंक मोबाईल पथकाचे कर्मचारी तपासात मदत करीत आहेत.