Jalna News – बहिणीच्या लग्नापूर्वीच दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

जालना शहरातील मोती तलावामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. 26 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. चार दिवसांनी त्यांच्या बहिणीच लग्न होतं, त्यामुळे घरात लग्नाची गडबड सुरू होती. परंतु भावांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जुना जालना भागातील शेर सवारनगरातील जुनेद असेफ सय्यद (19) आणि आयान आसिफ सय्यद (15) हे दोघेही स्कूटीवर आपल्या मामासह नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरामध्ये आले होते. यावेळी त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला आणि दोघही पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे काही क्षणातच दोघेही पाण्यात बुडाले. कुटुंबियांना तात्काळ घटनेची माहिती चंदनझिरा पोलिसांना व अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर तलावात शोधमोहिम राबवण्यात आली. तब्बल दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे जुना जालना भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बहिणीच चार दिवसांनी लग्न येऊन ठेपलं होतं. त्यातच ही दर्दैवी घटना घडल्यामुळे सय्यद कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.