
जम्मू-कश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात सोमवारी हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यावर प्राणघातक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले तर सहा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुस्थानी लष्कराच्या कॉर्प्सच्या हद्दीत ही घटना घडली.
संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील माचेडी भागात दहशतवाद्यांनी हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला’.
दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी जवानांनी हल्लेखोरांना जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर हिंदुस्थानी जवानांनीही प्रत्युत्तर दिले’.
जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
राजौरी जिल्ह्यातील माजाकोट भागात 7 जुलै रोजी लष्कराचा एक जवान जखमी झाल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एक मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.