
जम्मू-कश्मीरमध्ये पूंछ परिसरात नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी भुसुरुंग स्फोट झाला. या स्फोटात लष्कराचा एक जवान शहीद झाला तर अन्य तीन जखमी झाले. जखमी जवानांना एअरलिफ्ट करत उधमपूर येथील आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हवेली तहसीलमधील सालोत्री गावातील व्हिक्टर पोस्टजवळ शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील घुसखोरी रोखण्यासाठी हे भुसुरूंग ठेवण्यात आले होते. लष्कराच्या 7 जाट रेजिमेंटचे सैनिक नियमित गस्तीवर असताना या भुसुरुंगाचा स्फोट झाला.
लष्कराच्या 7 जाट रेजिमेंटचे नायब सुभेदार हरी राम, हवालदार गजेंद्र सिंह आणि अग्निवीर ललित कुमार हे आग्रीम चौकीजवळ नियमित गस्त घालत होते. यादरम्यान जमिनीखाली गाडलेल्या एम-16 सुरुंगाचा स्फोट झाला. या स्फोटात अग्निवीर ललित कुमार शहीद झाले, तर हवालदार गजेंद्र सिंह आणि सुभेदार हरी राम गंभीर जखमी झाले.
लष्कर आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि स्फोटाच्या परिस्थितीचा तपास सुरू करण्यात आला आहे. सीमेपलीकडून घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सैन्य नियमितपणे या अग्रभागी गस्त घालते आणि सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग म्हणून भूसुरुंग बसवले जातात.